अतुल गुळवणी
रत्नहाराच्या सौंदर्याची पारख करायला रत्नपारख्याची गरज भासत नाही.त्याच्या तेजावरुनच रत्नहाराची प्रचिती येत असते. रात्रराणीच्या सुगंधाचीही कुणी चर्चा करीत नाही वार्याच्या एका झुळकेबरोबरच त्या रातराणीच्या सुगंधाचा मोहक सुवास सर्वत्र दरवळत. तद्वतच गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाची महती सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासली नाही.त्यांच्या सुमधून आवाजातून उमटलेल्या गाण्यांच्या ओळ्यातून लतादीदी काय ताकतीच्या गायिका आहेत हे अवघ्या भारतानेच नव्हे तर जगाने अनुभवले. गेली सत्तर,ऐंशी वर्षाहून अधिक काळ आपल्या स्वरांनी अवघ्या भारतीयांना मोहिनी घालणार्या लतादीदी…भारतरत्न लता दीदी…लाखो गाणी गुणगुणत त्या गाण्यांना प्रचंड लोकप्रिय करणार्या स्वरसम्राज्ञी लतादीदी… चित्रकार लतादीदी, उत्तम फोटोग्राफर लतादीदी, क्रिकेटच्या चाहत्या लतादीदी …अशी असंख्य रुपातून या सरस्वतीने मराठी माणसालाच नव्हे तर जिथे जिथे भारतीय माणूस जगाच्या कानाकोपफ्यात पोहोचला आहे अशा अवघ्या विश्वालाच या स्वरांन मोहोवून टाकलेले आहे.अवघ्या मराठी माणसांची दिवसांचा प्रारंभ लतादीदींच्या सुमधूर स्वरांनी सुरु होतो आणि त्यांच्याच सुमधूर स्वरांनी शांत,शांत झोपही लागते.इतके अतूट नाते लतादीदींचे महाराष्ट्राशी आहे.त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारची हजारो गाणी पार्श्वगायिका म्हणून गायिली.त्या प्रत्येक गाण्याला लतादीदींचा परीसस्पर्शच झाला आणि त्या परिसाचे सोन्यात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.मराठी भक्तीसंगीत असो वा भावगीते, शेकडो चित्रपटांना लतादीदींनी पार्श्वगायन केलेे आहे ती सर्व गाणी लोकप्रियच ठरली.अगदी पन्नास,साठ,सत्तरच्या दशकात ज्या ज्या मराठी,हिंदी चित्रपटांमधील गाण्यांना लतादीदींनी पार्श्वगायन केले ती गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत.मग त्यात प्रेमगीत असो वा विरहगीत अथवा एखादे भजन,भावगीत.या सर्व गीतांचे स्वर कानी पडले की ऐकणारा तल्लीन झाल्याशिवाय रहात नाही.इतकी जादू लतादीदींच्या आवाजात ठासून भरलेली आहे.
साधी राहणी, उच्च विचारसरणी हे ध्येय उराशी बाळगून,व्यवसायाशी एकनिष्ठ राहिलेल्या लतादीदी या बहुआयामी व्यक्तिमत्व होत्या.मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची ज्येष्ठ कन्या असलेल्या लतादीदींनी दिनानाथांच्या पश्चात आपल्या आई माई मंगेशकरांसह चार भावंडे,उषा,आशा,मीना आणि पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांचे संगोपण करताना घराचा नावलौकिक आपल्या अविट गायिकेने वाढविला. त्यामुळे वयाची 93 वर्षे पूर्ण केली असली तरी त्यांच्यातील विनम्र भाव तसूभरही कमी झालेला नव्हता. सदैव हसतमूख चेहरा,वागण्यातही घरंदाजपणा,जरीकाठीची शुभ्र पांढरी साडी असा त्यांचा साधाच पण भारतीय संस्कृती जोपासणारा पोषाख सर्वांनाच कायमचा भावला.अगदी विदेशातही संगीत रजनीचे कार्यक्रम करताना लतादीदींनी आपल्या वागण्यात किंचितही फरक केला नाही. उलट त्यांच्या या अत्यंत शिस्तबद्धपणामुळे त्यांचे कायक्रम नेहमीच लोकप्रिय होत राहिले.
मराठी चित्रपटसृष्टीतही लता मंगेशकर यांचे योगदान अद्वितीय असेच आहे. विशेष करुन चित्रतपस्वी भालजी पेंंढारकर यांच्या प्रत्येक चित्रपटातील गीते ही लता मंगेशकर यांनीच गायिली आहेत.आनंदघन म्हणून त्यांनी भालजी पेंढारकर निर्मित साधी माणंस, मराठा तितूका मिळवावा आदी चित्रपटांसाठी पार्श्वसंगीताबरोबरच पार्श्वगायनही केलेले आहे.या सिनेमातील सर्वच गाणी कमालीची लोकप्रिय झाली.सत्तर वर्षानंतरही त्या गाण्यांची अविट गोडी तसूभरही कमी झालेली नाही. मराठी मातीशी इमान राखत लतादीदींनी शेकडो मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. ते सर्वच चित्रपट आजही केवळ लतादीदींच्या गाण्यांसाठी कमालीचे लोकप्रिय ठरलेले आहेत. चित्रपती व्ही.शांताराम यांनी निर्माण केलेल्या दो ऑखे बारह हाथ असो वा नवरंग.अथवा पिंजरामधील दे रे कान्हा चोळी अन लुगडी..हे गायिलेली लावणी असो.यामधील लतादीदींनी गायिलेली गाणी आजही रसिकाना भूरळ पाडल्याशिवाय रहात नाही.पिंजराच्या निर्मितीला पन्नास वर्षे पूर्ण झाली.या सिनेमातील गाणी उषा मंगेशकर यांनी म्हटली आहेत.फक्त एकच गाणे लतादीदींनी म्हटले.अशा कितीतरी घटना लतादीदींच्या बाबतीत सांगता येतील.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे अभंग लतादीदींनी आपल्या समधूर आवाजांनी अजरामर करुन टाकले.त्यामुळे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी स्वररुपाने मराठी माणसांच्या मनात कायमची घर करुन राहिली.अगदी पहाटेच्यावेळी लतादीदींचे स्वर कानी पडले की प्रत्येक मराठी माणूस प्रसन्न होऊन जात असे. तीन, चार पिढ्यांचे ऋणानुबंध या स्वरांनी कळत, नकळत जुळून राहिलेले आहेत. वयाची नव्वदी पार केली असली तर लतादीदींच्या स्वरात तसूभरही फरक पडलेला नाही. उलट उतारवयातही विविध आजारांवर मात करीत त्यांचा स्वर अखेरपर्यंत आहे तसाच राहिला.ही त्यांना लाभलेली दैवी देणगीच म्हटली पाहिजे.सरस्वतीच जणू त्यांच्या मुखातून उमटत राहिली.मग ते अभंग असो वा भावगीते,प्रेम,विरह अशी कितीतरी प्रकारची गाणी लतादीदींनी गायिली.पण त्या सर्व गाण्यांचे माधूर्य रसिकांच्या मनातच नव्हे तर ह्दयात अमृतासारखे पाझरत राहिले हे नक्की.आज लतादीदी शरीराने या जगात नसल्या तरी त्यांचा आवाज हीच त्यांची खरी ओळख राहणार आहे.त्या सुद्धा मोठ्या अभिमानाने म्हणत असतं.
नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज़ ही, पहचान है
गर याद रहे..
एखादी व्यक्ती देहाने या जगाचा निरोप घेतला खरा,पण लौकिकार्थाने त्या या दुनियेत आपल्या जादुई आवाजाने मात्र चिरंतर स्मरणात राहतील हे नक्की.लतादीदींविषयी किती,लिहावे,काय लिहावे तेवढे थोडेच आहे.प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याविषयी नेहमीच आदर वाटत होता आणि यापुढेही तो आदर तसाच राहील हे त्रिवार सत्य आहे.लतादीदींना भावपूर्ण आदरांजली.
लतादीदींनी कविवर्य भा.रा.तांबे यांची
जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय
ही कविता आपल्या आवाजाने अजरामर केली आहे.एखादी व्यक्ती लोप पावली की सारेजण क्षणभर हाय हाय करतील.पण लतादीदींच्या बाबतीत तसे घडणार नाही.जोपर्यंत चंद्र,सूर्य आहेत तोपर्यंत लतादीदींचा आवाज हा समस्त रसिकांना मंत्रमुग्घ केल्याशिवाय राहणार नाही.महान गायिकेला भावपूर्ण आदरांजली.