। म्हसळा । वार्ताहर ।
आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा तालुक्यात गटविकास अधिकारी एम. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सईद अहमद कादिरी यांच्या एचपी गॅस एजन्सीतील सिलेंडरवर स्टिकर चिटकवून घरोघरी मतदान जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचीत्य साधून न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती रॅली न्यू इंग्लिश स्कूल ते पोलीस ठाणे दरम्यान काढण्यात आली. तसेच, सर्व रिक्षा चालक आणि मालक यांनाही मतदानाचे महत्व सांगून रिक्षावरही जनजागृती स्टिकर लावून एक वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा गटविकासधिकारी एम. के. जाधव यांनी केला.
जाधव यांनी सांगितले की, भारत देश हा लोकशाही प्रणाली मानणारा देश असून मतदान करणे हे प्रत्येकाची केवळ जबाबदारी नसून ते आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सईद अहमद कादिरी, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी चौधरी, सलीम हसवारे, एचपी गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी, ग्रामसेवक, पाटील, हनुमंत मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद मोरे, केंद्र प्रमुख नरेश सावंत, देवगावकर आदी उपस्थित होते.