प्रशासनाकडून चोख बंदोबस्त आणि मतदारांना अधिक सुविधा
| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील 12 झोन आणि 67 मतदान केंद्रामध्ये बुधवारी (दि.20) सकाळपासून मतदारांच्या रांगा लागण्यास असंख्य वाहनांद्वारे मतदारांची उपस्थिती कारणीभूत ठरली. पोलीसांनी पोलीस निरिक्षक अनिल जाधव आणि प्रशासनाने तहसिलदार कपिल घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या मतदान प्रक्रियेसाठी चोख बंदोबस्त व मतदारांना अधिक सुविधा देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
पोलादपूर तालुक्यामध्ये एकूण 21 हजार 562 पुरूष आणि 22 हजार 131 महिला अशी एकूण 43 हजार 693 मतदारसंख्या असून अधिकाधिक वेगाने मतदान करून मतदारांना पुन्हा त्यांच्या शहरात रवाना करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रीय दिसून येत होते. पोलादपूर-3 मतदान केंद्र रानबाजिरे प्राथमिक शाळेमध्ये 913 एकूण मतदार संख्येपैकी आदिवासी मतदारांची संख्या 50 व इतर मतदारांची संख्या 863 असल्याने याठिकाणी दुपारपर्यंत मतदान होऊन नंतर शांतता दिसून आली. कापडे बुद्रुक येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांमध्ये मतदारांची तुडूंब गर्दी दिसून आली. याठिकाणी परगावी राहणार्या मतदारांच्या वाहनांची दाटी महाबळेश्वर आणि बोरघर रस्त्याच्या दुतर्फा दिसून आली. पोलादपूर 351 मतदान केंद्राबाहेर वारली आणि गोंडी चित्रकला असलेल्या प्रवेशद्वारामुळे मतदारांचे स्वागत होत असल्याचा आभास निर्माण झाला. अपंग तसेच सक्षम नसलेले 483 मतदार पोलादपूर तालुक्यात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर अशा मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली. पोलादपूर शहर तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रांमध्ये आरोग्यसेविका तसेच आशासेविकांचा तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.
राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदान प्रक्रियेमध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रावर दिसून येत असताना अनेक ठिकाणी बूथवरील कार्यकर्त्यांमध्ये एकोपा दिसून आला. पोलादपूर तालुक्यातील सवाद, तुर्भे बुद्रुक, पोलादपूर, लोहारे, मोरसडे, देवळे, उमरठ, वाकण, चांभारगणी बुद्रुक, देवपूर, पळचिल, पैठण या 12 झोनमधील 67 मतदान केंद्रांमध्ये दुपारी मतदारांची गर्दी कमी झाली. पोलादपूर शहरामध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नळाचे पाणी भरून झाल्यानंतर महिला मतदारांची गर्दी वाढली. यानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर गर्दी ओसरून जेवणाच्या वेळेनंतर पुन्हा साडेतीन वाजल्यानंतर गर्दी वाढू लागली. मात्र, ग्रामीण भागातील परगावी राहणारे मतदार आणि स्थानिक मतदार यांचे मतदान झाल्यानंतर दुपारपासूनच मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसू लागला. दुपारी 3 वाजेपर्यंत पोलादपूर तालुक्यात सरासरी 38 टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली असताना मतदानाची मुदत संपेपर्यंत 54 टक्के सरासरी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणुक विभागाकडून व्यक्त करण्यात आला.