| तळा | वार्ताहर |
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय तळा यांच्या वतीने मतदार जनजागृती व नोंदणी अभियान कार्यक्रम मंगळवार दि.17 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम थोरात यांनी केले. यावेळी तळा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार मंगेश पालांडे उपस्थित होते.
तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक भारत जाधव यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच, नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती दिली. यावेळी 90 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी अर्ज देण्यात आले. मतदार नोंदणी अर्ज कसा भरायचा हे विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती व नोंदणी यांचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक म्हणून प्रसाद सुतार व किरण नागावकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.





