जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक शाळेतून उत्स्फुर्त प्रतिसाद
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील निवडणुक प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन काम करीत असताना मतदानाचा टक्का ही वाढण्यासाठी प्रशासनाने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांसह माध्यमिक शाळांमध्ये चित्रकला, मतदार शपथ, निवडणुक गीत, रांगोळी, पोस्टर, प्रश्न मंजूषा आदी विविध स्पर्धांबरोबरच पालकांना विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र आदी उपक्रम स्वीप कार्यक्रमांतर्गत राबवून मतदान जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदार संघातील 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. त्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 55 हजार 893 मतदार, 85 वर्षापुढील 35 हजार 863, दिव्यांग 13 हजार 191 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदार आहेत. 73 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. बुधवारी (दि.20) नोव्हेंबरला दोन हजार 790 केंद्रामध्ये मतदान होणार आहे. त्यामध्ये युवा, महिला व 85 वर्षावरील मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये मतदानाची प्रतिज्ञा घेणे, निवडणूक गीत वाजविणे, मान्यवर व्यक्ती, प्रसिध्द कलावंत खेळाडू यांच्याकडून मतदान करण्याचे आवाहन करणे अशा अनेक प्रकारचे उपक्रम विधानसभा मतदार संघात सुरु करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी शाळांमध्ये चित्रकला, पोस्टर, पालकांना संकल्प पत्र, प्रश्न मंजूषासारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक शाळांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन गावे, वाड्यांमध्ये मतदान जनजागृती करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरु केलेल्या या उपक्रमाचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत चित्रकला व इतर स्पर्धा शाळांमध्ये घेण्यात आल्या. मतदानचा टक्का वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
– कृष्णा पिंगळा, गटशिक्षणाधिकारी, अलिबाग