101 ग्रा.पं.मधील निवडणुकीची तयारी
पोलिसांची करडी नजर
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गावचा कारभारी कोण याचा फैसला करण्यासाठी रायगडात रविवारी ( 18 डिसेंबर) निवडणूक होणार आहे. 240 पैकी 191 सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. 240 सरपंचपदासाठी 531 उमेदवार तर 1 हजार 940 सदस्यपदासाठी 3 हजार 238 उमेदवार भवितव्य अजमावित आहेत. 618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मतदान केंद्रावर प्रशासनाचे 3 हजार 708 कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. रविवारी होणार्या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींसाठी 16 डिसेंबर 2022 रोजी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अलिबाग 6, मुरुड 5, पेण 26, पनवेल 10, उरण 18, कर्जत 7, खालापूर 14, रोहा 5, सुधागड 14, माणगाव 19, तळा 1, महाड 73, पोलादपूर 16, म्हसळा 13, श्रीवर्धन 13 या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे.
240 पैकी मुरुडमधील 1, पेण 2 उरण 1, माणगाव 3, महाड 22, पोलादपूर सात अशा पन्नास ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. थेट सरपंचपदासाठी नागरिकांमधून निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांनी भर दिला होता; मात्र असे असले तरी मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या आहेत. त्यामुळे रविवारी होणार्या मतदानात मतदार हा कोणाच्या बाजूने आपले मत पारड्यात टाकणार हे सोमवारी 20 डिसेंबर रोजी कळणार आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त –
निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 618 मतदान केंद्रांवर 3 हजार708 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 30 संवेदनशील केंद्र असून याठिकाणीही प्लाटुन, दंगल पथक, शीघ्र कृतीदल तैनात केले आहे. निवडणूक आयोगामार्फत मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.