महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे निवेदन
। पनवेल । वार्ताहर ।
तळोजासह नवी मुंबई शहर परिसरात वीज वितरणासाठी अदानी इलेक्ट्रिक कंपनीने समानंतर परवानासाठी अर्ज सादर केलेला आहे. या परवाना अर्जाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, अभियंता उपस्थित होते. तळोजा शहरासह नवी मुंबई क्षेत्रातील महावितरण कंपनीच्या अधिपत्या खालील महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अदानी इलेक्ट्रिक कंपनीने समानंतर परवानासाठी अर्ज सादर केलेला आहे. परंतु अशा प्रकारचा पहिला प्रयोग सदर ठिकाणी होत असून, सदरबाब जर असा परवाना राज्यात दिला गेला, तर राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील. याबाबत महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने शिरीष घरत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सुद्धा आपल्या भावना राज्यशासनाकडे पोहोचवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.