। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
युथ फोरम आयोजित 18 व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात म.वा. म्हात्रे लिखित गज्या कादंबरीला स्वर्गीय नकुल पाटील स्मृती आगरी साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युथ फोरमचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांच्या उपस्थितीत अॅड. समीर पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रोख रुपये दहा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी शिक्षक आ. बाळाराम पाटील, युथ फोरमचे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, युथफोरमचे सर्व कमिटी सदस्य, अँड पी.सी. पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे, म.सा.प. पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्यिक सुरेश देशपांडे, अनंत शिसवे, अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण आगरी बोलीमध्ये लिहिलेली गज्या ही कादंबरी ग्रामीण भागातील शेतकरी जीवन चितारते. साहित्यिक मुल्ये अलंकृत असल्याने ही कादंबरी पुरस्कारासाठी निवडण्यात आली, अशी संयोजकांनी उस्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली. म.वा.म्हात्रे हे प्रथितयश लेखक आहेत. अ.भा.स.चे अध्यक्ष कैलास पिंगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.