वाहतूक कोंडीची समस्या गंभीर

वाहतूक कोंडीने नागरिक, पर्यटक हैराण

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरूड शहरात बाजारपेठ, मासळी मार्केट आणि बंदर मार्गावरील विश्राम बाग मार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिक आणि पर्यटक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, सकाळी, सायंकाळी बाजारहाट करण्याच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. यावर कोणाचेही प्रभावी नियंत्रण नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या त्रासामुळे प्रशासनाला वाहतूक कोंडीबाबत प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.

बंदर मार्गावरील विश्रामबागजवळ अरुंद मार्ग आहे. सायंकाळी वाहनांची संख्या वाढल्याने प्रचंड कोंडी होत असल्याने प्रकरणे हमरीतुमरीवर येताना दिसत आहेत. येथे पार्किंग नसल्याने अनेकजण मोटारसायकली घेऊन रस्त्याच्या बाजूला पार्क करीत असल्याने मोठी वाहने पास होणे अवघड होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडून वाहने खोळंबली जात आहेत. याच मार्गावर असलेल्या मासळी मार्केट जवळ रोजच्या वाहनांच्या कोंडीने तर नागरिक प्रचंड हैराण आहेत. येथे देखील कुठेही पार्किंग उपलब्ध नाही. मुरूड शहराच्या बाजारपेठ भागातदेखील सकाळच्या वेळी बेशिस्त काही मंडळी मोटारसायकली लावत असल्याने कधी कधी चालणेदेखील मुश्कील होत आहे. पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यामुळे वाहनांची वर्दळ अधिक वाढणार असल्याने कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने प्रसंगी कठोर नियमांचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

Exit mobile version