वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जण जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगनआर कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या 14 चाकी ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे सुमारे 3.05 वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात कारमधील एकूण सहा जण जखमी झाले असून, त्यामध्ये तीन महिलांसह एका लहान बालकाचा समावेश आहे. जखमींमध्ये जयेश राज शर्मा (27, नवी मुंबई), अशा श्रीनिवास नायडू (80, भांडुप), सुरेखा श्रीनिवास नायडू (48, भांडुप), तीर्थ जितेंद्र ठाकूर (वय 18, भांडुप), प्रिय श्रीनिवास नायडू (वय 1) आणि योगिता सतीश नायडू (वय 38, भांडुप) यांचा समावेश आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जगदगुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेतून त्यांना यश मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, सलग सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. विशेषतः गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढत असून, अपघातांची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version