निधी असूनदेखील दुर्लक्षितपणाचा पर्यटनावर परिणाम
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाबरोबर येथील ‘मदगड’ किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुढे यावे यासाठी या वनदुर्गकडे जाण्याचा रस्ता 2021 मध्ये मंजूर झाला. मात्र, मंजूर रस्त्याला वनविभागाचा होणारा अडथळा दूर झाला तरी अद्याप पर्यटन विकासाबरोबर शिवप्रेमींची इतिहासाकडे जाणारी वाट थांबली आहे.
तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराजवळच असलेले वांजळे या लहानशा गावाजवळील मदगड हे शिवकालीन आहे. आजूबाजूला नयनरम्य असे हिरवेगार डोंगर, यातून वळण घेत उंच गड किल्ल्याकडे जाणारा रस्ता सर्व काही निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवत होणारा प्रवास पर्यटकांच्या व दुर्गप्रेमींच्या पसंतीचा आहे. मात्र, पुढे किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर झाडाझुडुपांचा अडथळा होत असल्याने सुस्थितीत रस्त्याची मागणी करण्यात आली. श्रीवर्धनमधील अनेक ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय असून, त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच उद्देशाने किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मागणीनुसार कोकण पर्यटन ग्रामीण विकास या योजनेंतर्गत 600 मीटर अंतरातील रस्त्याला मंजुरी मिळाली. अंदाजे 15 लाख निधीच्या तरतुदीनुसार दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे कामदेखील सुरू झाले. मात्र, पर्यटनवाढीसाठी चालना मिळून हातांना रोजगार मिळण्याची संधी असतानाच सुरु झालेले रस्त्याचे काम बंद आहे.
चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो. या किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याचे काम हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग करीत आहे. यामधील वन विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण होणे बाकी होते. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्याबाबतचा प्रस्ताव हा वन खात्याकडे 2022 मध्ये पाठवला होता. याबाबतची कोणतीच अडचण नसल्याचेदेखील आता वनविभागाकडून समजते. त्यामुळे आता विलंब न करता येथील रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवप्रेमींसह वांजळे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मदगडावरील जाणाऱ्या रस्त्याची माहिती घेतली जाईल. वन विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार परवानगी प्रक्रिया पूर्ण होताच काम सुरू होईल.
प्रवीण मोरे, उपअभियंता,
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन
पर्यटन हे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र, दोन वर्षे उलटूनसुद्धा मदगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बनला नाही. त्यामुळे पर्यटन विकासाबरोबर आम्हा स्थानिकांना मिळणारी रोजगाराची संधी हुकली आहे.
बाळकृष्ण गायकर, वांजळे, रहिवासी