चारा, पाण्यासाठी मेंढपाळांची भटकंती

| पाताळगंगा | वार्ताहर |

घाटमाथ्यावरून पश्‍चिम महाराष्ट्रातील मेंढपाळांचे तांडे कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पनवेल-खोपोली मार्ग, पाली-खोपोली राज्य महामार्गावर चारा-पाण्यासाठी शेळ्या व मेंढ्यांचे कळप गावोगावी कुटुंब कबिल्यासह भटकंती करताना दिसत आहेत.

मान्सूनचा पाऊस सुरू होताच कोकणातील मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागतात; मात्र पावसाचा जोर कमी होताच साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर ते पुढे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मेंढपाळ कोकणात येतात, परंतु यंदा घाटमाथा, पश्‍चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नोव्हेंबरमध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. खेचरावर आपला संसार घेऊन मेंढ्या जगवण्यासाठी चार्‍याच्या शोधात मेंढपाळांचा कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. शेळ्या-मेंढ्या, घोडे, कोंबड्या, राखणदार कुत्रे यांचाबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह अन् शेळ्या-मेंढ्या जगवण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करून कोकणाकडे कूच केले आहे.

कारवणी पद्धतीचा आधार
हिवाळ्यात मेंढपाळ शेळ्या-मेंढ्यांचा मोठा कळप घेऊन आल्यावर दिवसा-रात्री आपले बिर्‍हाड एखाद्या शेतात घेऊन बसतात. त्या वेळी शेळ्या-मेंढ्याचे मूलमूत्र शेतात पडून शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होते. त्याला कारवणी पद्धत म्हणतात. कोकणात पूर्वीपासून चालत आलेली कारवणी पद्धत आजही आपले अस्तित्व टिकवून असल्याचे दिसते. कारवणी पद्धत मेंढपाळांना जगवतेय. शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीखताला मोठी मागणी असते. फळबागांना हे खत अधिक उपयुक्त ठरते. शेतजमीन अधिक कसदार होऊन उत्पादनात वाढ व्हावी याकरिता शेतकरी मेंढपाळांना दरवर्षी स्वतःहून बोलावून शेळ्या-मेंढ्या शेतात बसवतात. त्यांना शेतकर्‍याकडून तांदूळ व पैसे बिदागी दिली जाते.
Exit mobile version