। मुरूड । वार्ताहर ।
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील मेंढपाळ चारा-पाण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. पुढील सहा महिने कोकणात मुक्काम करून पुन्हा आलेल्या मार्गी आपल्या मूळ गावी प्रस्थान करतात. सध्या येथील माळरानावर आपले बिर्हाड घेऊन भटकंती करताना मेंढपाळ दिसून येत आहेत. तर, शेतकर्यांकडून त्यांना काही पैसे देऊन शेळ्या-मेंढ्यांना शेतामध्ये बसविल्या जात आहेत. तर, मेंढ्यांची लोकर विकून हातामध्ये चांगले पैसे येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे-सातार्यातील काही दुष्काळग्रस्त भागातून अनेक मेंढपाळ नोव्हेंबरच्या सुमारास रायगड जिल्ह्यात दाखल होतात. यंदाही मुरूड तालुक्यातील शिघ्रे, वाणदे, जोसरांजण, वावडुंगी, नवीवाडी आदी गावातील मोकळ्या रानमाळावर मोठ्या प्रमाणात मेंढपाळ दाखल झाले आहेत. त्यांच्या शेळ्या-मेढ्यांना येथील माळरानावर मुबलक असा चारा-पाणी मिळत आहे. घाटमाथ्यावरील दुष्काळी भागात पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोकणात यावे लागते, असे येथील मेंढपाळ शंकर पडळकर यांनी सांगितले. त्यामुळे मेंढीपालनाचा जोड व्यवसाय फायदेशीर असल्याचे ते म्हणाले.
एक मेंढी सरासरी तीन ते चार हजाराला खासगी वा बाजारात विकली जाते. शिवाय दीडशे ते दोनशे मेंढ्या बाळगताना 25 ते 30 किलो लोकर विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, बागायतदारांच्या शेतात मेंढ्या रात्रभर बसवल्यास खर्ची म्हणून मेंढपाळांना पुरेसे पैसे दिले जातात. भात पिकविणारे शेतकरी तांदूळही देऊ करतात. मेढ्यांना विशेषतः रात्रीचे संरक्षण कवच म्हणून दिमतीला चार ते पाच तगडी कुत्रीही मेंढपाळांकडून पाळली जातात. एका गावातून दुसर्या गावात संसार वाहून नेण्यासाठी घोडेही उपयोगी ठरतात.