। चिरनेर । प्रतिनिधी ।
स्थानिक आणि पारंपरिक मच्छिमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारी आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या शेवंड आता मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार अडचणीत आले आहेत.
जगभरातील सर्वच समुद्रात शेवंड आढळतात. खडकाळ, वाळूमय किंवा गढूळ पाण्यात तसेच खोल समुद्रात शेवंड आढळून येतात. शेवंडाचे काटेरी व बिनकाटेरी असे प्रकार आहेत. हिंदी महासागरात त्यांच्या 5 जाती आढळतात. समुद्रातील खडकाळ किनार्यावर अथवा वाळूमय पाण्याच्या ठिकाणी या शेवंड आढळून येतात. स्थानिक मच्छीमार छोट्या होड्यांनी शेवंड मासळी पकडतात.1 नंबर सदरात मोडणारी शेवंडीचे वजन 300 ते 1500 ग्रॅम भरते. 1600 ते 1800 रुपये किलो प्रति दराने या शेवडींची घाऊक बाजारात विक्री होते. 100 ते 250 ग्रॅम वजनाची शेवंड 2 नंबरच्या सदरात मोडते. या दोन नंबरच्या शेवंडीना प्रति किलो 1100 ते 1200 रुपये भाव मिळतो. गुजरात, अलिबाग, वरळी, मुरुड, श्रीवर्धन, रेवदंडा व इतर परिसरातुन शेकडो स्थानिक मच्छिमार शेवंड विक्रीसाठी घाऊक बाजारात घेऊन येतात. दररोज सुमारे 450 ते 500 किलो शेवंड खरेदी करतो. त्यानंतर निर्यात कंपनीच्या व्यापार्यांना विक्री केली जाते. शेवंडाचे मांस अत्यंत रुचकर असून खाण्यासाठी ते ताजे अथवा गोठवून वापरतात. देशभरातील पंचतारांकित हॉटेल आणि आखाती देशात या शेवंडीला मोठी मागणी आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी समुद्रात मागील काही वर्षांपासून शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांकडूनही मागणी प्रमाणे शेवंडीचा पुरवठा होत नाही. परिणामी पुरवठा होत नसल्याने मागणी असुनही निर्यात कंपन्यांना शेवंडीचा पुरवठा करणे शक्य होत नाही. अशी माहिती मागील 35 वर्षांपासून शेवंड विक्रीचा व्यवसाय करणारे कसारा-मुंबई येथील घाऊक व्यापारी असिफ शेखानी यांनी दिली. दिवसाकाठी एक -दोन किलो शेवंड मिळाल्यास मच्छिमारांसाठी शेवंडीचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो. मात्र सध्या समुद्रात शेवंड मिळण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक आणि पारंपरिक मच्छिमारांना आर्थिक फायदा मिळवून देणारा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे उमेश कोळी यांनी सांगितले.