अलिबागची कबड्डीपटू सानिका गोळेचे स्वप्न; राज्य शालेय संघात निवड झालेली पहिली खेळाडू
| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय कबड्डी संघातून खेळण्याचे स्वप्न मी उराळी बाळगले आहे, असा विश्वास अलिबागची कबड्डीपटू सानिका संदीप गोळे हिने व्यक्त केला. तालुक्यातील वेश्वी येथील सानिका हिची महाराष्ट्र शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्य शालेय संघात निवड झालेली जिल्ह्यातील ती पहिली खेळाडू आहे. 3 ते 8 जानेवारीला राज्यस्थान-जयपूर येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत ती खेळणार आहे. पीएनपी शाळेच्या संघातून खेळणारी विद्यर्थिनी आणि ओमकार क्रीडा मंडळाची खेळाडू सानिका गोळे हिच्या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सानिकाने तालुका, जिल्हा व पालघर येथे झालेल्या राज्य विभागाच्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. 28 ते 30 नोव्हेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील तालुका आष्टी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय कबड्डी स्पर्धेत उजवा मध्यरक्षक व उत्कृष्ट चढाई केली. तिच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य शालेय कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या शालेय महिला कबड्डी स्पर्धेत निवड झालेली सानिका गोळे ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. तिने आपल्या पीएनपी शाळेचे, ओमकार क्रीडा मंडळाचे आणि वेश्वी गावाचे तसेच अलिबाग तालुका व रायगड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. तिच्या यशाबद्दल तिचे पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन केले. तिच्या यशस्वी वाटचालीत ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व कबड्डी प्रशिक्षक प्रफुल्ल पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, क्रीडा शिक्षिका दक्षता शेरमकर यांचे सहकार्य लाभल्याचे तिने सांगितले.
सानिकाने अशी बजावली कामगिरी
सानिका वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळाची खेळाडू आहे. गेली पाच वर्षे ती ओमकार क्रीडा महिला कबड्डी संघांचे प्रतिनिधित्व करीत आहे. सानिका अभ्यासासोबत रोज तीन तास कबड्डीचा सराव करते. सानिकाला आता भारतीय कबड्डी संघातून खेळण्याचे स्वप्न आहे. यापूर्वी तिने ओमकार वेश्वी संघाकडून खेळताना रायगड जिल्हा किशोरी गट निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत सलग दोन वर्षे विजय संपादन केला. आपल्या संघाला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी तिने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याबद्दल तिची सलग दोन वेळा रायगड जिल्हा किशोरी गट कबड्डी संघात निवड झाली आहे







