30 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान मुसळधार पाऊस
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 30 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारपासून खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी राहील, मात्र ढगाळ वातावरण कायम राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलदरम्यान पुन्हा पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई व ठाण्यात उकाडा कायम असला तरी सोमवारी राज्यातील इतर भागांमध्ये हवामानात मोठा बदल होणार आहे. पश्चिम विदर्भात पावसाची सुरुवात होण्याची शक्यता असून उर्वरित भागांतही वातावरण अस्थिर राहील. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या काढणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. तसेच वादळी पावसादरम्यान नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
