विभाग नियंत्रकांची मुरुड आगाराला तात्काळ भेट
| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड आगारासाठी भंगार गाड्या दिल्याने त्या रस्त्यामध्ये बंद पडत आहेत. परिणामी, मुरुड तालुक्यातील असंख्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत समाजसेवक अरविंद गायकर यांनी मुरुड आगाराला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने पेण येथील विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी मुरुड आगाराला नुकतीच भेट दिली.
यावेळी समाजसेवक अरविंद गायकर यांच्यासमवेत मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाबू सुर्वे, भावेश शहा, उत्तम पाटील, सुधीर दांडेकर, सुशील ठाकूर, समीर रांजणकर, देवेंद्र सतविडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी समाजसेवक अरविंद गायकर यांनी विचारले की, गाडीतून धूर येणे, गाडी चारही बाजूने फाटलेली व बुराक पडलेली एसटी याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत आपण काय कार्यवाही केलीत. यावेळी विभाग नियंत्रक यांनी सांगितले की, अशा गाड्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी गायकर यांनी सांगितले की, जर जुन्या व जीर्ण झालेल्या गाड्या मुरुड आगाराला मिळत असतील तर प्रवासी वर्गांनी हा त्रास कितपत सहन करावा. या भंगार गाड्यांबाबत मागील दीड वर्षांपासून पत्रव्यव्हार करूनसुद्धा आपण कोणतीही दखल घेतली नाहीत म्हणून मुरुड आगाराला टाळे ठोकण्याचा इशारा द्यावा लागला आहे. रायगड विभागाला लवकरच 100 नवीन गाड्या येत आहेत, अशी आमची माहिती आहे. त्यामधून मुरुड आगाराला 15 गाड्या तरी नवीन देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी केली. यावर घोडे यांनी, जर रायगड विभागास शंभर गाड्या प्राप्त झाल्या, तर यातील जास्तीत जास्त नवीन गाड्या आम्ही मुरुड आगाराला प्रधान करू असे आश्वासन दिले. यावेळी मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाबू सुर्वे यांनी सांगितले की, मुरुड आगारांसाठी सर्वोत्तम गाड्या देणे खूप आवश्यक आहे. कोणतीही सबब न सांगता लवकरात लवकर गाड्या द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नका.
यावेळी अरविंद गायकर यांनी, अलिबाग बसथांब्यावर मुरुडच्या प्रवाशांना तासन्तास थांबावे लागते. ज्याप्रमाणे रेवदंडा-अलिबाग या गाड्या एक-एक तासाने अलिबाग आगारातून सुटतात, त्याचप्रमाणे अलिबाग-मुरुड गाड्याही एक-एक तासाने सोडल्या जाव्यात, अशी मागणी केली. यावर विभाग नियंत्रक घोडे यांनी मुरुड आगार व्यवस्थापकांना गाड्या सुरु करण्याचे आदेश दिले. मुरुड आगारातील जुन्या व जीर्ण झालेल्या गाड्या बंद करण्यात याव्यात व त्याऐवजी नवीन गाड्या मुरुड आगाराला देण्यात याव्यात अन्यथा आचारसंहिता संपल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा अरविंद गायकर यांनी दिला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यात आला.