। खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नगरपालिका,नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटने आणि महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.1 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले असताना खोपोली नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. या कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सोमवारी दि .23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार आहे.
विविध मागण्यांचे मागणी पत्र पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांना देऊन यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी केली आहे. याच दरम्यान लक्ष वेदण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र या पत्रावर कोणताच निर्णय घेण्यास पालिका प्रशासन पुढे येत नाही त्यामुळे येथील कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत पालिका कार्यालया समोर घोषणाबाजी करत सोमवारी दि 23 मे रोजी हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करून शंभर टक्के काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल अशा इशारा पालिका कामगारांनी दिला आहे.
सफाई कामगार मागील अनेक महिन्यापासून विविध मागण्यांसाठी पालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. हे आंदोलन ही सुरू केले तर शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली तरीही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने 23 मे पासून शंभर टक्के काम बंद आंदोलन भूमिका घेणार असल्याचे स्थानिक कामगार युनियन अध्यक्ष दिलीप सोनावणे सांगितले.