स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर पुलाजवळ पाईपलाईन लिकेज झाली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. स्थानिक प्रशासनाकडून या प्रश्नाकडून तात्काळ दखल घेतली नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात पाऊस पडल्याने धरणे, नदी, तलाव पाण्याने भरली आहेत. मात्र गेली अनेक दिवस पावसाने लपंडाव सुरु केला आहे. कधी ऊन, तर कधी पाऊस तर कधी रिपरीप सुरु आहे. भातलावणीची 99 टक्क्यांपर्यंत पूर्ण ही झाली आहेत. परंतु, पाऊस नसल्याने लावणी केलेल्या भात पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाचा हंगाम असतानाही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एक ते चार दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा दुष्काळ भरपावसात जाणवत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचा दुष्काळ असताना अलिबाग-रोहा मार्गावरील नवघरजवळ पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. नवघर पुलाजवळ पाईप लिकेज झाल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेल्याचे दिसून आले. करंजाचे स्वरूप निर्माण झाले. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना करण्यास स्थानिक प्रशासन उदासीन ठरले. पाणी वाया जाऊ नये म्हणून काही स्थानिकांना प्लास्टिक अवरण तसेच उच्च दाबातून बाहेर पडणारे पाणी थांबविण्यासाठी बाजूला दगड लावण्याचे काम केले.
