टँकर्सचा आकडा पंचाहत्तरी पार; लाखो नागरिकांना पाणीटंचाईचा फटका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाने अद्याप पाठ फिरवल्यामुळे ऐन पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून, अनेक धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 92 गावे, 303 वाड्या अशा एकूण 395 ठिकाणी असलेल्या दीड लाख नागरिकांना पाणीटंचाई फटका बसत असून, 78 टँकरद्वारे त्यांची तहान भागविण्याचे काम सुरू आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली. सुरुवातीला अलिबाग व पेण तालुक्यातील गावांचा समावेश होता. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणारी धरणे तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येणारे पाझर तलावांमधील जलसाठा कमी झाला. धरणांसह पाझर तलावांमधील पाणीसाठा अवघा 18 टक्केच शिल्लक आहे. काही धरणांमधील जलसाठा संपला असून, काही धरणांमध्ये जलसाठा संपण्याच्या वाटेवर आहे. धरणांनी तळ गाठल्याने मातीमिश्रीत पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. गतवर्षी जून महिन्याच्या पंधरा दिवसांत धरणांसह शेते पाण्याने भरली होती. यंदा मात्र जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही पाऊस अद्याप पडलेला नाही.
त्यामुळे पाणीसंकट गंभीर झाले आहे. जिल्ह्यातील 92 गावे, 303 वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. एक लाख 53 हजार 157 नागरिकांना या टंचाईचा फटका बसत आहे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून या गावे व वाड्यांमधील नागरिकांसाठी 78 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. परंतु, पाणी मुबलक मिळत नसल्याने पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. सर्वात जास्त पाणीटंचाई महाड, कर्जत, पेण, त्याखालोखाल पनवेल, माणगाव, म्हसळा, मुरूड, तळा, अलिबाग, पोलादपूर, रोहा, खालापूर, पोलादपूर या तालुक्यांमध्ये पाणीसमस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी महाड तालुक्यातील 17 गावे, 111 वाड्यांमध्ये 11 टँकर्स, कर्जतमधील सात गावे, 22 वाड्यांमध्ये 14 टँकर्स. पेणमधील 13 गावे, 78 वाड्यांमध्ये 12 टँकर्स या तालुक्यांमध्ये सर्वात जास्त पाणीटंचाई असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. महाडमधील 32 हजार, पेणमधील 27 हजार, म्हसळामधील 13 हजार, पनवेलमधील 18 हजार, कर्जतमधील 13 हजार 112 नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. अलिबागमधील आठ हजार 782, उरणमधील चार हजार 505, खालापूरमधील आठ हजार 588, सुधागडमधील एक हजार 768, रोहामधील दोन हजार 556, माणगावमधील नऊ हजार 297, पोलादपूरमधील सहा हजार 455 श्रीवर्धनमधील चार हजार 569, मुरूडमधील एक हजार 39 आणि तळामधील 373 नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाऊसच पडत नसल्याने पाणीपुरवठा कसा उपलब्ध करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
शेतकरी हवालदिल
गतवर्षी पावसाने हजेरी लवकर लावली. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपासूनच पेरणीला सुरुवात झाली होती. त्यामुळे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भात लागवडीसाठी रोपे तयार झाली होती. काही ठिकाणी लावणीच्या कामांना सुरुवात झाली होती. यंदा पावसाने विलंब केला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भात बियाणांची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. काही शेतकऱ्यांनी धूळवाफे पेरणी केली आहे. परंतु, पाऊस नसल्याने ते शेतकरीदेखील अडचणीत सापडले असल्याचे बोलले जात आहे.
बांधावरील भाजीपाला संकटात
पाऊस पडेल या आशेवर राहून अनेक शेतकऱ्यांनी बांधावर भाजीपाला लागवड केली आहे. दुधी, भेंडी, चवळीसह अन्य भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना बोअरवेल आणि विहिरीमधील पाण्यामार्फत जगविण्याचे काम केले जात आहे. मात्र, विहिरीसह बोअरिंगदेखील कोरड्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे. बांधावरील भाजीपाला पीक संकटात येण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जून महिना संपत आला, तरी पाऊस पडला नाही. पाण्याचा दुष्काळ निर्माण होत असताना भाजीपाला, भातपीक लागवड करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाऊस पेरणीयोग्य समाधानकारक पडत नाही, त्याचा फटका बसण्याची भीती आहे.
सतीश म्हात्रे,
शेतकरी
