माथेरानमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नेरळ-कुंभे येथून पाणीपुरवठा सुरू ; 23 नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमधील दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माघार घेतली आहे. आता शहरात आठवड्यातून केवळ दोन दिवस पाणी कपात केली जाणार असून, 23 नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू झाले आहे. नेरळ-कुंभे येथील उल्हास नदीवरील पंप दुरुस्त करून पाणीउपसा सुरू करण्यात आल्याने माथेरानवरील पाणीटंचाईचे संकटही काही प्रमाणात दूर झाले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कोणतीही पाणी कपात केली जाणार नाही.

माथेरानमधील पाणीपुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. प्राधिकरणाने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन जाहीर केल्यानंतर पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी विरोध केला होता. नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या सभेत उल्हास नदीतून दररोज पाणी उपसा करावा आणि उन्हाळी पर्यटन हंगामासाठी शार्लोट लेकचे पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर उपअभियंता स्वप्नील सुळे यांनी कुंभे येथील नादुरुस्त पंप तातडीने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पंप दुरुस्त करून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. माथेरानला दररोज सुमारे 20 लाख लिटर पाण्याची गरज असून, पर्यटन हंगामात ही मागणी 35 लाख लीटरपर्यंत जाते. त्यामुळे शार्लोट लेकचे पाणी पर्यटन हंगामासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन आहे.

पाणीकपातीचे वेळापत्रक
सोमवार आणि बुधवार : मुस्लिम मोहल्ला, वाल्मिकी नगर, पार्क व्ह्यू पॉईंट नवीन, मंकी पॉईंट, दस्तुरी, बाजार पीव्हीसी, इंदिरा नगर, ऑलिम्पिया एसी.
मंगळवार आणि गुरुवार : ऑलिम्पिया मेन, पार्क व्ह्यू पॉईंट जुना, मार्केट, कोतवाल नगर, पंचवटी नगर, रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज रोड, ऑलिम्पिया पीव्हीसी. शनिवार आणि रविवार : पाणी कपात नाही.
नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी : 23 नोव्हेंबरपासून.
Exit mobile version