| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्ग कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतातत राहिला आहे. एक तपाहून अधिक काळ उलटला तरी हा महामार्ग पूर्णत्वाला गेलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या तारीख पे तारीख या धोरणामुळे सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाची नकोशी ओळख तयार झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि दिरंगाई यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे नद्या आणि ओढ्यांचे ओसंडणारे पाणी रस्त्यावर येऊन वाहनांचा महामार्ग जलमार्ग बनल्याचे भयावह चित्र पाहावयास मिळाले.
रायगड जिल्ह्यात दाखल झालेल्या मान्सूनने दमदार सुरुवात केली आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार सलग तीन दिवस पावसाने सरासरीची शंभरी गाठली आहे. तीन दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. या कालावधीत नागरिकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या प्रमुख नद्यांनी इशारा पातळी, धोका पातळी ओलांडल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसाने रायगडकरांना झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसात अनेक मुख्य रस्त्यांवर झाडे उन्मळून पडून वाहतूक खोळंबली होती. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाने लक्ष वेधून घेतले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर महाड, माणगाव, कोलाड, नागोठणे या ठिकाणी महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने वाहतूक मंदावली होती. महामार्गावर पाणी साठण्याचा खरा कहर कर्नाळा खिंडीनजीकच्या बांधनवाडी येथे पाहावयास मिळाला. कर्नाळ्याच्या जंगलात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुराचा फटका परिसरातील गावांना बसलाच त्याचबरोबर पुराच्या पाण्याने मुंबई-गोवा महामार्गावर दस्तक दिली. सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत महामार्गावर पाणी साचून महामार्ग पाण्याखाली गेला होता. यामुळे महामार्गावर कर्नाळा आणि पेणच्या दिशेने होणारी वाहतूक खोळंबली होती. पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर वाहतूक सुरू झाली. पाणी साचलेले असल्याचे पाहूनदेखील अनेक स्टंट करणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या गाड्या या पाण्यामधून पुढे नेण्यासाठीची कसरत केल्याचे पाहावयास मिळाले.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पहिल्या पावसापासून निर्माण झालेली ही समस्या अद्याप कायम असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुचाकी, रिक्षा, कार आणि अवजड वाहने मार्ग काढत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने किरकोळ वादही होत आहेत. वारंवार ही परिस्थिती उद्भवत असतानाही महामार्ग प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याचा तातडीने निचरा करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठिकठिकाणी खड्डे
गेल्या पंधरा वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या वर्षी हे काम पूर्ण होईल आणि कोकणवासियांचा प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे याही वर्षी कोकणची वाट खडतरच असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. महामार्गावर नागोठणे जवळील कोलेटी येथे उड्डाण पूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांना सध्या सर्व्हिस मार्गांचा वापर करावा लागत आहे. या सर्व्हिस मार्गिकांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना खड्ड्यामधून आदळत आपटत पुढील मार्गक्रमण करावे लागत आहे. या ठिकाणच्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था आहे. खड्ड्यांमधील खडी बाहेर आली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या परिसरातून मार्गक्रमण करतांना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाणी साचलेल्या खड्ड्यामधून वाहने चालवतांना अंदाज येत नसल्याने वाहने आपटण्याचे प्रमाण वाढले आहे.







