भेरव अंबा नदी पुलावरून गेले पाणी

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील भेरव गावाजवळ असलेल्या अंबा नदी पुलावरून रविवारी (दि. 4) पाणी गेले. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ ठप्प होती.
मुसळधार पावसाने पुन्हा एकदा सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्याला झोडपले असून, यामुळे महत्त्वाच्या नद्या या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. अंबा नदीदेखील दुथडी भरून वाहत असल्यामुळे भेरव येथील पुलावरून पाणी गेले. काही दिवसांपूर्वीच या पुलाची चांगल्या पद्धतीने डागडुजी करण्यात आली होती. मात्र, आता पुलावरून पुन्हा पाणी गेल्यामुळे पुलाच्या या कामाला फटका बसून पुलाची दुरवस्था होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पुलावरून येथून पेण तसेच महागाव, चंदरगाव व इतर महत्त्वाच्या गावांना जोडले जाते. मात्र, पुलावरून पाणी गेल्यामुळे येथील अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच अनेक लोक व वाहने दोन्ही बाजूला अडकून पडली. काही दिवसांपूर्वी पुलावरून पाणी जात असताना पाली पेण ही सीएसटी बस चालकाने पुराच्या पाण्यातून काढली होती. त्यामुळे संबंधित चालकाला निलंबितदेखील करण्यात आले.

Exit mobile version