पनवेल शहरासह ग्रामीण भागात लवकरच पाण्याचे मीटर

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शहर व 29 गावांमध्ये लवकरच पाण्याचे मीटर लागणार आहेत. यासंदर्भात लवकरच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत निविदा काढण्यात येणार असून याकरिता सुमारे 18 कोटींचा खर्च येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत या कामाला मंजुरी देखील मिळाली आहे.

पनवेल शहर व ग्रामीण भागात हे मीटर लागणार आहेत.सध्याच्या घडीला पाणीपुरवठा करताना नागरिकांकडून सरासरी नुसार पाण्याचे वार्षिक बिल आकारले जाते.विशेष म्हणजे पाणीपुरवठा करीत असताना चोख मोजमाप यामुळे होत नाही.यामध्ये अधिक सुसूत्रता येणार असून प्रत्येक कनेक्शन मागे पाणी मीटर लागणार असल्याने पाण्याचा वापर देखील काटकसरिने होणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने काही ठिकाणी नव्याने पाणी जोडणी देण्यात आली आहे. यामुळे अशा ठिकाणी हे मीटर लागणार आहेत. महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार जवळपास 11569 मीटर नव्याने बसविले जाणार आहेत.

यामुळे जेवढे पाणी वापरण्यात येईल तेवढेच पाण्याचे बिल या रहिवाशांना भरावे लागणार आहे.अमृत योजनेअंतर्गत सुमारे 438 कोटींचा निधी पनवेल महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे.यामुळे ग्रामीण भागात विविध कामे मार्गी लागणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.ग्रामीण भागात पाण्याच्या टाक्या,मलनिस्सारण वाहिन्या आदींची कामे यामुळे मार्गी लागणार असून ग्रामीण भाग व शहरी भागातील दरी दूर होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण भागात मीटर लावण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.यासंदर्भात टेंडर प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली.

पाण्याचा अपव्यय थांबणार
काही ठिकाणी नव्याने जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.सध्याच्या घडीला पाणी वापरावर कोणतेही निर्बंध अथवा मोजमाप यंत्रणा अस्तित्वात नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरु आहे.हजारो लिटर पाणी वाया जात असून मीटर लागल्यावर पाण्याचा अपव्यय आपोआप थांबणार आहे.

Exit mobile version