रखरखत्या उन्हात पाण्याचे हंडे वाहून नेण्याची वेळ
टँकर सुरू करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतमधील चाहूचीवाडी येथील नळपाणी योजना बंद पडली आहे. येथील नवीन नळपाणी योजना अपूर्ण असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेटाची वाडी येथे जाऊन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान रखरखत्या उन्हात हे आदिवासी लोक पाण्याने भरलेले हांडे वाहून नेत असल्याचे चित्र मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्गावरून येणा-जाणाऱ्यांच्या नजरेत पडत आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने टँकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी ग्रामस्थ कमळी वामन ढोले यांनी केली आहे.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. कळंब ग्रामपंचायतीमधील चाहुचीवाडी या आदिवासी वाडीसाठी असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या वाडीसाठी राबवण्यात येत असलेली नळपाणी योजना बंद पडली आहे. तर नवीन जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांच्या कामाला खीळ बसला आहे. या वाडीतील तरुणांनी मागील वर्षी वाडीच्या पायथ्याशी असलेल्या कूपनलिकेतून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे वाडीत आणले होते. मात्र, त्या जलवाहिनीतून देखील पाणी वाडीत पोहचत नसल्याने आदिवासी लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. सध्या येथील आदिवासी महिला आणि काही पुरुष देखील पिण्याचे पाणी आणण्यासाठी मुरबाड तालुक्यातील गेटाचीवाडी वाडी येथे जाऊन पाणी आणत आहेत. या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप असलेल्या कूपनलिकेतून मिळणारे पाणी चहूचीवाडीत आणण्यासाठी चार किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. त्यात हा प्रवास मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सुरू असतो.
पाण्याची टंचाई वाढल्याने येथील महिलांची सकाळ पाण्याचे हांडे घरातून घेऊन गेटाची वाडी असा प्रवास याने होत आहे. महिला सकाळी आठ वाजता या आदिवासी वाडीतून पाणी आणण्यासाठी निघतात. मुरबाड तालुक्यातील गेटाचीवाडी या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप या ठिकाणी देखील तासभर थांबावे लागते. त्यानंतर या महिलांना चार ते पाच हांडे पाणी मिळते आणि नंतर या महिला ते पाणी घेऊन मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून पायपीट करून घराकडे येतात.
वाडीतील महिलांना आपल्या घरातील पशु-पक्षी जनावरे यांच्यासाठी देखील पाणी न्यावे लागते. तर आठवड्याचे कपडे या वाडीमधील महिलांना कळंब-नेरळ रस्त्यावरील उल्हास नदी येथील दहिवळी पूल येथे जाऊन धुवून आणावे लागतात. त्यासाठी देखील येथील आदिवासी लोकांना खास रिक्षा करून कपडे घेऊन नदी गाठावी लागते. ही नदी चाहूची वाडी येथून 13 किलोमीटर अंतरावर असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड आदिवासी लोकांना सहन करावा लागत आहे.
शासनाने आमच्या वाडीतील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तात्काळ टँकर सुरू करावा अशी मागणी आहे. आमच्या संयमाची प्रतीक्षा सरकारने पाहू नये आणि टँकर सुरू केला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्गावर बसून रस्ता अडवण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही.
– कमळी ढोले, स्थानिक महिला







