माणगावमधील झोरेवाडीवर पाण्याचे संकट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील झोरेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे असह्य केले आहे. रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महिलांवर आज ओंजळीभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्यांतून जीवघेणी पायपीट करण्याची वेळ आली आहे. घोटभर पाण्यासाठी सुरू असलेली ही वणवण आता केवळ टंचाईपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती गावकऱ्यांच्या जगण्याशी, आरोग्याशी आणि भवितव्याशी थेट जोडली गेली आहे. मंत्र्यांच्या गावातच पाण्याची अशी दुरवस्था असेल, तर अन्य ठिकाणच्या सामान्य जनतेचे काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या 64 गावे आणि 230 वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तब्बल एक लाख 13 हजार 701 नागरिक पाण्याच्या संकटात सापडले आहेत. माणगाव तालुक्यातील चार गावे आणि 15 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील झोरेवाडीची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाली आहे. सुमारे 30 घरांची आणि 200 हून अधिक लोकवस्ती असलेल्या या वाडीमध्ये आजही पाणी पोहोचलेले नाही.
झोरेवाडीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 40 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे स्वदेश फाऊंडेशनमार्फत राबविण्यात आलेली पाणी योजनादेखील व्होल्टेज समस्येमुळे ठप्प पडली आहे. विजेच्या कमी दाबामुळे पाण्याचा पंप बंद पडत असून, गावात पाणीच पोहोचत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाईवर बैठका, घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडतो; मात्र झोरेवाडीतील वास्तव आजही अंगावर काटा आणणारे आहे. डोंगर माथ्यावर वसलेल्या या वाडीतील वृद्ध महिलांना हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणताना महिलांची अक्षरशः दमछाक होत आहे. अनेकदा जीव धोक्यात घालून त्यांना डोंगर उतरत पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे.
गावकऱ्यांच्या नशिबी कोरडे घडे!
विशेष म्हणजे, झोरेवाडीपासून हाकेच्या अंतरावर धरण आणि नदी असूनही गावकऱ्यांच्या नशिबी कोरडे घडेच आले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे उपलब्ध जलस्रोतांचा लाभ गावापर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणीटंचाईमुळे गावातील अनेक तरुण रोजगारासाठी मुंबईसह इतर जिल्हे आणि राज्यांत स्थलांतरित झाले आहेत. गावात सध्या प्रामुख्याने वृद्ध महिला आणि काही मोजकी मंडळीच राहात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाण्यासाठीची झुंज अधिकच वेदनादायी बनली आहे.
झोरेवाडीमध्ये जलजीवन योजनेचे काम सुरू असून पुढील पंधरा दिवसांत ते पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्वदेश फाऊंडेशनमार्फत पाणी योजना सुरू आहे. मात्र, व्होल्टेज समस्येमुळे पाणी गावात पोहोचत नाही. सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, झोरेवाडी डोंगरावर असल्याने काही टँकर थेट वाडीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे महिलांना काही अंतर पायी जाऊन डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.
हरदास शेडगे,
सरपंच, पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत
