16 नोव्हेंबरपासून विभागनिहाय पाणीकपात; जीवन प्राधिकरणाविरोधात माथेरानकर आक्रमक
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटनासाठी देशभरातून पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत असतानाच आता शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 16 नोव्हेंबरपासून विभागनिहाय पाणीकपात जाहीर केल्याने माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आठवड्यातील तीन दिवस प्रत्येक विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, केवळ रविवारी संपूर्ण शहराला पाणी मिळणार आहे. हॉटेल, लॉजिंग आणि अन्य पर्यटन व्यवसाय पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असताना घेतलेल्या या निर्णयामुळे माथेरानकर संतप्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणाने पाणी कपातीऐवजी योग्य नियोजन करावे, अशी मागणी करत बुधवारी ग्रामस्थ आणि व्यावसायिक एकवटणार आहेत.
माथेरान हे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले थंड हवेचे ठिकाण आहे. दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. शहरातील नागरिकांसह पर्यटकांच्या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यातूनच प्राधिकरणाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
माथेरानला ब्रिटिशकालीन शार्लोट तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उल्हास नदीतूनही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. कुंभे, नेरळ, जुम्मापट्टी येथील जलवाहिनी आणि पंपिंग यंत्रणेद्वारे हे पाणी सुमारे 800 मीटर उंचीवरील माथेरानमध्ये पोहोचवले जाते. एवढा लांबचा प्रवास करून पाणी आणले जात असतानाही माथेरानकरांना देशातील सर्वाधिक दराने पाणी विकत घ्यावे लागत असल्याची नाराजी आहे. त्यातच आता पाणीकपातीचा निर्णय लादल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.
उन्हाळी पर्यटन हंगामात पाण्याची मागणी वाढते. हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, माथेरानची उंची आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता टँकरने पाणी आणणेही सहज शक्य नाही. त्यामुळे पाणीकपात कायम राहिल्यास पर्यटन व्यवसायासमोर मोठे संकट उभे राहणार आहे. उन्हाळी हंगामातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी कपात आवश्यक असल्याचे प्राधिकरणाकडून सांगितले जात असले, तरी त्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या रोजगारावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विभागनिहाय पाणीकपातीचे वेळापत्रक
सोमवार, बुधवार, शुक्रवार : जुना मेरी रोड, ऑलिम्पिया मेन व पीव्हीसी, पार्क व्ह्यू साईट, कोतवाल नगर, संत रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, शेलार गल्ली.
मंगळवार, गुरुवार, शनिवार : मुस्लिम मोहल्ला, वाल्मिकी नगर, पार्क व्ह्यू पॉइंट नवीन, मंकी पॉइंट, दस्तुरी, बाजार पीव्हीसी, इंदिरा नगर, ऑलिम्पिया एसी.
रविवार : कोणत्याही विभागात पाणी कपात नाही.
माथेरानमधील सर्व प्रकारचे व्यवसाय पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय येथील पर्यटन व्यवसाय संपुष्टात आणणारा ठरू शकतो. याविरोधात बुधवारी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्णय घेऊ. व्यावसायिकांनीही एकजुटीने या लढ्यात सहभागी व्हावे.
– शिवाजी शिंदे
शहरातील नागरिक पाणी जपूनच वापरतात. मात्र, प्रतिहजार लीटर पाण्याचे दर पाहिले तरी घाम फुटतो. एवढे महाग पाणी देऊनही कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आधी पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि त्यानंतरच पाणीकपातीचा विचार करावा.
– चंद्रकांत जाधव
