28 धरणांमध्ये अवघे 53 टक्के पाणी शिल्लक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाढत्या तापमानामुळे धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणार्या धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. 28 धरणांमध्ये सरासरी 53 टक्के पाणी आहे. त्यामध्ये सुधागडमधील ढोकशेत धरणात फक्त 18 टक्के, श्रीवर्धनमधील रानीवली धरणात 22 टक्के, तर म्हसळ्यामधील संदेरी धरणात 92 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने मेपर्यंत ही टंचाई भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणांचा समावेश आहे. या धरणांतून जिल्ह्यातील गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यटन झपाट्याने वाढू लागले आहे. परिणामी नागरिकीकरणामध्येदेखील वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचे व्यवस्थापन करण्याची वेळ लघुपाटबंधारे विभागावर येते. मागील काही दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणजे धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा शिल्लक होता. आताच्या स्थितीत पाण्याच्या पातळीत एक टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये 53 टक्के पाणी असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील 28 धरणांपैकी सहा धरणांमध्ये 22 ते 39 टक्के, नऊ धरणांमध्ये 41 ते 55 टक्के, दहा धरणांमध्ये 60 ते 74 टक्के, दोन धरणांमध्ये 80 ते 90 टक्के आणि एका धरणामध्ये 92 टक्के जलसाठा असल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. म्हसळा तालुक्यातील संदेरी तालुक्यात 92 टक्के, त्या खालोखाल पेमधील आंबेघर धरणात 80 टक्के, रोहामधील सुतारवाडी, म्हसळामधील पाभरेमधील धरणात 74 टक्के, सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणात 18 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 16 धरणांमध्ये 55 टक्क्यांपेक्षा कमी पाणी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यानुसार पाण्याची टंचाईदेखील भयावह जाणवत आहे.
जिल्ह्यात पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी जलजीवन योजना राबविली. पाण्याचे वेगवेगळे स्त्रोत वापरून पाणीपुरवठा घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही कामे अपूर्ण स्थितीत तसेच अनेक वेळा वादाच्या भोवर्यात सापडल्याने पाण्याचा प्रश्न अजूनही जिल्ह्यात कायमच असल्याचे चित्र आहे. ठेकेदारांनी कामे पूर्ण करूनही बिले न देणे, ठेकेदारांकडून कामे अपूर्ण स्थितीत असणे, यामुळे पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा टँकरमुक्तीची संकल्पना कागदावरच
रायगड जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये जलजीवन योजनादेखील सुरु केली आहे. यातून पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा रायगडकरांना होती. परंतु, हा प्रश्न सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात टँकरमुक्तीसाठी प्रशासनाने प्रयत्न केले. परंतु, ही संकल्पना फक्त कागदावर असल्याचे दिसून येत आहे.