खांदा वसाहतीमधील पाणीपुरवठा सुरळीत

महादेव वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश

| पनवेल | प्रतिनिधी |

खांदा वसाहतीमधील सेक्टर 9 परिसरातील नागरिकांना काही दिवसापासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या या समस्येचे निराकरण व्हावे या हेतूने परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर उतारा म्हणून ज्यादा व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती अध्यक्ष वाघमारे यांनी दिली आहे.

खांदा वसाहतीमधील सेक्टर 9 परिसरात असलेल्या हरिदर्शन, उमया कृपा, गुरुस्मृती, वरद विनायक, गणेश अपार्टमेंट, श्री श्रध्दा आणि स्वागत या सात रहिवाशी संस्थांमधील नागरिकांना मागील काही दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत होते. याबाबत सदर रहिवाशी संस्थांमधील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता वाघमारे यांनी याबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची माहिती देत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली. वाघमारे यांच्या मागणीची दखल घेत शुक्रवारी (दि.16) सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची भेट घेऊन काही दिवसातच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Exit mobile version