उमटे धरणातून पाणी पुरवठा बंद झाल्याने घेतली धाव
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गाळाने भरलेल्या उमटे धरणातून गाळयुक्त पाणीपुरवठा तोही तीन तीन दिवसआड हो असल्याने ऐन पावसाळ्यात तहानलेल्या रामराज विभागातील ग्रामस्थांनी शेकापच्या महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटील यांना साकडे घातले. त्यावर शासनाला कोणत्याही प्रकारचे निवेदन सादर करत न बसता चित्रलेखा पाटील यांनी सर्वप्रथम या विभागात पाण्याचे टँकर स्वखर्चाने पुरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुखावलेल्या ग्रामस्थांनी चित्रलेखा पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
राज्यात चाललेल्या अस्थिरतेच्या वातावरणात अलिबागच्या मतदारांनी विश्वास दाखवलेले लोकप्रतिनिधी राज्याबाहेर मौजमजा करीत असताना मतदारसंघात मात्र मतदारांचे वाईट हाल सुरु आहेत. वर्षभरापूर्वी गाळाने भरलेल्या उमटे धरणाच्या गाळाच्या उपशाचे श्रेय लाटण्यासाठी मोठया थाटात नारळ फोडणार्या खासदार आणि आमदारांनी सदर गाळ उपसा अर्धवट झाला असतानाही लक्ष दिले नाही. त्यामुळे यंदा देखील गाळाने भरलेल्या उमटे धरण आटल्याने होत असलेला गाळयुक्त पाणीपुरवठा पिण्यायोग्य नाही. त्यात हा पाणीपुरवठा ऐन पावसाळ्यात तीन तीन दिव आड होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठया प्रमाणावर हाल होत होते. या संकटात ग्रामस्थांना आठवण झाली ती संकटात नेहमीच हाकेला धाव घेणार्या शेकापच्या महिला आघाडी नेत्या चित्रलेखा पाटील यांची. ग्रामस्थांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांची भेट घेऊन आपली समस्या मांडत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गार्हाणे मांडले. त्यावर चित्रलेखा पाटील यांनी शासनाकडे कोणतेही निवेदन, मागणी सादर न करता तात्काळ जिथे गरज आहे तिथे मागणीनुसार पाण्याच्या टँकरने स्वखर्चातून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत रामराज मोहल्ला, रामराज कोळीवाडा, पिंपळवाडी, भिलजी, महान डेपो, नवघर, उमटे, थेरोंडा या भागात टँकरने पाणीपुवरठा केला जात आहे. यासाठी शेकापक्षाचे अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, सुभाष वागळे, महेश झावरे, नासीर बेबन, लियाकत पटेल, अमोल टिवळेकर, सोहम वागळे, संतोष टिवळेकर, दर्पण चौलकर, नितीन पालकर आदी कार्यकर्ते मेहनत घेत नियोजन करीत आहेत.
उमटे धरणात गाळ साचल्याने आम्हाला पाणी पुरवठा होत नाही. जे पाणी येत आहे ते पिण्यायोग्यच काय इतर कामासाठी देखील वापरता येणारे नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात आमचे हाल होत होते. मात्र चित्रलेखा ताईंनी आम्हाला पाणीपुरवठा उपलब्ध करुन दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.
नम्रता झावरे, गृहिणी भिलजी