नाला तुंबल्याने रोहा-नागोठणे मुख्य रस्ता पाण्याखाली

। रोहा । प्रतिनिधी ।

तीन-चार तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे अष्टमी गावाकडे जाणारा मुख्य नाला तुंबल्याने रोहा-नागोठणे मुख्य रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस मुसळधार पावसाने परत एकदा दमदार सुरुवात केल्यानंतर अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी तुंबल्याने रहिवाशी, वाहनचालक, पादचारी एकंदरीत साऱ्यांची धावपळ उडाली होती.

मागील दोन दिवसापासून रोहा शहर व ग्रामीण भागात परत एकदा मुसळधार पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे नदी, नाले, ओहल तुडुंब भरून वाहत होते. कुंडलिका नदीतील पाण्याच्या पातळीतदेखील वाढ झाली आहे. त्यातच रोहा शहरातील अष्टमी गावाकडे जाणारा नाक्यावरील जुना जकात येथील मुख्य नाल्यात पुन्हा एकदा कचरा अडकल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने नाला तुंबून नाक्यावरील रक्तपेढी व सफा मर्वाह इमारत चाळ समोरील गटार ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे रोहा-नागोठणे मुख्य रस्त्यावरून ढोपरभर पाणी वाहत असल्याने दोन्ही मार्गावरील येणा-जाणाऱ्या वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही गाड्या पाण्यात जाऊन बंददेखील पडल्या.

नगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना व वाहनचालकांना नाहक फटका सहन करावा लागत असल्याने नगरपालिका प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

नाला तुंबल्याने रोहा-नागोठणे हम रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याची माहिती समजताच नगर पालिका कर्मचारी वर्ग लावून नाला स्वछ करण्यात आला व त्यामुळे पाण्याचा निचरा झालेला आहे. भविष्यात याविषयी चांगली उपाय योजना करावी लागणार.

– मनोज पुळेकर, नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक

Exit mobile version