‘ती लढली म्हणून आम्ही घडलो’

पेण | प्रतिनिधी |
सावित्री बाई फुले यांनी त्या काळी दगड-गोटे खाल्ले आणि पहिली मुलींकरिता शाळा काढली आणि म्हणून आमच्यासारख्या महिलांना मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पतंग उत्सवाचे आयोजन करण्याचे धाडस आज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी संक्रांतनिमित्ताने अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधी मंचमार्फत आयोजित महिला पतंग उत्सवात काढले. त्या बोरगाव-पेण येथील कासमाळ येथील आदिवासीवाडीवरुन पतंग उडवण्याचा आनंद आदिवासी मुलींसमवेत घेत होत्या.
यावेळी मंचाच्या शैला धामणकर, डॉ. नीता कदम, ज्योती राजे, विजय कदम, केतकी साठे, मधुबाला नीकम आदी उपस्थित होते. 2012 पासून पेण रायगड येथे निर्भया बलात्कार प्रकरणानंतर महिला अत्याचार विरोधी मंचाची स्थापना झाली. या मंचामार्फत दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीपासून स्त्री-पुरुष समानतेचे अभियान राबविण्यात येते.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘पतंग उडवा, कोरोना घालवा’ अभियानाचा शेवट कासमाळ डोंगर, पेण येथे 13 जानेवारी रोजी साजरा झाला. यावेळी अंकुर ट्रस्टमधील आदिवासी बालिका यांनी आदिवासी 15 वर्षांवरील मुलींना यामार्फत लसीकरणास प्रवृत्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम करून जनजागृती केली. संस्थेच्या तरुण कार्यकर्त्या श्‍वेता देसाई, गौरी दळवी, मीनल सांडे, सारिका पवार यांनी याप्रसंगी जनजागृती गीते सादर केली. माळवाडी, इंदिरानगर, कासमाळ, बोरगाव परिसरातील तरुण मुलींनी पतंग उडवून आनंद घेतला.
गेल्या काही दिवसांपासून अंकुर ट्रस्टमार्फत विविध वीस आदिवासी वाड्यांमध्ये युवा शिबिरे घेण्यात आली. सदर अभियानाची सांगता पतंग महोत्सवात करण्यात आली.

Exit mobile version