महाराष्ट्रच नव्हे, तर देशावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचेय : ॲड. गौतम पाटील

। चौल । प्रतिनिधी ।

“शेतकरी कामगार पक्षाचा 79 वर्षांचा प्रवास हा केवळ एका राजकीय पक्षाचा इतिहास नाही, तर अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा, निष्ठेचा आणि पुरोगामी विचारांचा प्रवास आहे. या विचारसरणीला युवकांची साथ मिळाली, तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आणणे शक्य आहे,” असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी केले.

शेकापच्या 79 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना ते म्हणाले, “इतिहास साक्षी आहे की, प्रत्येक परिवर्तनाची सुरुवात युवकांच्या आंदोलनातून झाली आहे. शहीद भगतसिंगांचे स्वातंत्र्य आंदोलन असो, 1975 मधील विद्यार्थी चळवळ असो, मंडल आयोगाचे आंदोलन असो किंवा अलीकडील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात जंतर-मंतर येथे झालेला विद्यार्थ्यांचा संघर्ष असो, अन्यायाविरुद्धचा लढा युवकांनीच उभारला आहे.”

नीट पेपरफुटी प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. “विद्यार्थ्यांची मागणी केवळ इतकीच होती की, पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना महिनाभर संघर्ष करावा लागला. त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली आणि अखेर उशिराने राजीनामा घेण्यात आला,” असे ते म्हणाले.

शेकापच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देताना त्यांनी माजी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा प्रसंग सांगितला. “ पुलोद सरकार कोसळल्याची बातमी कळताच त्यांनी मंत्रीपद संपल्याची जाणीव ठेवून सरकारी गाडीचा वापर नाकारला आणि एसटीने प्रवास केला. सत्ता ही सेवेसाठी असते, मालकीसाठी नाही, हा शेकापचा संस्कार त्या कृतीतून दिसून येतो,” असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “भारतीय राज्यघटनेने अन्यायाविरोधात सनदशीर मार्गाने लढण्याचा अधिकार दिला आहे. त्याच मार्गाने विद्यार्थी आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील युवकांनी शिवाजी पार्कपासून दिल्लीतील जंतर-मंतरपर्यंत आपली ताकद दाखवून दिली.” डाव्या आणि पुरोगामी विचारसरणीचा उल्लेख करत ॲड. पाटील म्हणाले, “डावी विचारधारा कधीही संपणार नाही. शेतकरी कामगार पक्षानेही काळानुरूप बदल स्वीकारत युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. आ. बाबासाहेब देशमुख, अतुल म्हात्रे, ॲड. साम्या कोरडे, चित्रलेखा पाटील यांच्यासारखे तरुण नेते संघर्षाची परंपरा पुढे नेत आहेत.”

सरकारी यंत्रणेच्या गैरवापरावर टीका करत त्यांनी आगामी राजकीय लढाईचा निर्धार व्यक्त केला. “महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करायचा आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांचे राज्य प्रस्थापित करण्याचा संकल्प आपण या वर्धापन दिनी करूया,” असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version