विधानसभेला सर्व जागा लढवू- मनोज जरांगेंची घोषणा

| पुणे | प्रतिनिधी |

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत सगळ्याच्या सगळ्या 288 जागा लढवू, अशी घोषणा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात केली. 2013 मधील एका फसवणूक प्रकरणात जरांगे शुक्रवारी (दि. 31) पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले. त्या प्रकरणात न्यायालयानं जरांगेंना दिलासा दिला. त्यांच्या विरोधातलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. यानंतर न्यायालय परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी जातीवाद करत नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा इतकंच मी म्हणालो होतो. 4 जूनपासून मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केली. पाटील यांनी विधानसभेला उमेदवार दिल्यास सत्ताधार्‍यांना त्याचा फटका बसू शकतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, असं जरांगे म्हणाले. सगळ्यांनी कायद्याचा सन्मान राखायला हवा. तारीख असल्यानं न्यायालयात आलो होतो. माझ्यावर काहीच आरोप नाहीत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही. विनाकारण आरोप करणार्‍यांच्या आरोपात किती तथ्य असतं हे सगळ्यांना माहीत आहे. सरकारला माझ्याविरोधात काहीच सापडत नाही म्हणून ही केस ओपन झाली का, असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

जरांगेंच्या शिवबा संघटनेनं 2013 मध्ये एका नाटकाचं आयोजन केलं होतं. नाटकाच्या प्रयोगानंतर पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल झाला. कोथरुड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणात पुणे न्यायालायानं त्यांच्याविरोधात वॉरंट काढलं होतं. त्यामुळे जरांगे न्यायालयात हजर राहिले. न्यायालयानं त्यांच्या विरोधातलं अटक वॉरंट रद्द करत 500 रुपयांचा दंड ठोठावला.

Exit mobile version