| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
दिव्यांग, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड पायथ्याशी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांना दिले. असे असले, तरी दिव्यांगांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
अन्नत्याग आंदोलनाला तब्बल 30 तास उलटल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बासटेवाड आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा केली. मात्र, बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहिल्याने जिल्हाधिकारी जावळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यासोबतही संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या हस्ते बच्चू कडू नारळपाणी प्यायले. आपल्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. दिव्यांग, शेतकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर चर्चेसाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊन आणि त्यावर तोडगा काढू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती जिल्हाधिकार्यांनी केली.