उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार

| मुंबई | प्रतिनिधी |

देशासमोर शेतकरी, बेरोजगार, आदिवासी, अल्पसंख्याकांचे प्रश्न मोठे आहेत. या सर्व उपेक्षित वर्गांच्या प्रश्नांमध्ये लक्ष द्यावे लागेल. या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष साहित्याचे, ‌‘लोकसाहित्य’ अंकाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ते म्हणाले, “शेतकरी कर्जमाफीचा मोठा प्रश्न आहे. खतासाठी शेतकऱ्यांची रांग लागली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या घामाची किंमत कळत नाही. त्यामुळे मी या घटकासाठी पडेल ते कष्ट करायला तयार आहे.”

मंत्री गिरीश महाजन यांनी ‌‘ऑपरेशन ब्लू स्टार’वर केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, “राज्याच्या मंत्रिमंडळातील एका गृहस्थांनी शीख समाजाच्या कार्यक्रमात भाषण करताना इंदिरा गांधींवर टीका केली. इंदिरा गांधी यांनी देशाच्या प्रतिष्ठेबाबत तडजोड केली नाही. आपण शीख समाजाचे योगदान कधी विसरणार नाही. स्वातंत्र्य चळवळीपासून शेती-अन्नधान्याच्या प्रश्नांमध्ये शीख समाजाने योगदान दिले आहे. मात्र, त्याचबरोबर इंदिरा गांधींची, राजीव गांधी, जनरल वैद्य यांची हत्या झाली. त्याचे स्मरण करायला पाहिजे.”

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीवर त्यांनी टीका केली. “वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरील जाहिरातीची किंमत किती असते, याची माहिती मला आहे. त्यामुळे आजपर्यंत इंग्रजी दैनिकात राष्ट्रवादीची जाहिरात कधीही पाहिली नव्हती.”. दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील मालिकेसाठी आमदार रोहित पवार यांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मालिकेला 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले.

अनावश्यक हस्तक्षेप झाल्यास विचार करणार
अजित पवार गटाचा गुरुवारी मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन सोहळा होता. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत सर्वांना समजून घेतलं, पण यापुढे कुणीही अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार केला जाईल, असा सूचक इशाराच दिला आहे. त्यांच्या या भाषणानंतर सुनेत्रा पवारांचा रोख नक्की कुणावर होता, अशा चर्चा राजकीय वर्तुळाच रंगल्या आहेत. अजितदादांना जसा महाराष्ट्र अपेक्षित होता तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते कटिबद्ध राहतील, असा मला विश्वास आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
Exit mobile version