ग्राहकांची सुकी मच्छी, भाजीपाला खरेदीला पसंती
| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील शहरात एकमेव आठवडा बाजार बुधवारी भरत असून, लांबलेल्या पावसाळ्यानंतर दर बुधवारी बाजार भरणे सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारात गर्दी पहावयास मिळत आहे. सध्या कांद्याने सर्वसामान्यांना रडविले असताना सध्या बाजारपेठेत 80 ते 90 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे कांद्याची विक्री सुरू आहे. तर बुधवार बाजारात कांदा 70 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असल्याने कांदा, बटाटे खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. त्यातच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असल्याने आठवडा बाजारात अनेक भाज्यांचे भाव हे कमी दराने असल्याने ग्राहकांकडून भाजीपालाही मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.या बाजारात सुकी मच्छी नेहमीच मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असते.
सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी तालुक्यातील ग्राहक आवर्जून येतात. सुरमई, बोंबिल, बारीक सुकट, अंबाडी सुकट, मांदेली, म्हाकल्या, खारे मासे, अशी अनेक जातींची सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने या सुक्या मच्छीला बाजारात मोठी मागणी असते. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक बुधवारच्या बाजारात आवर्जुन सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी येत असतात.याबाबत बाजारातील व्यापार्यांना विचारले असता मागील बाजारापेक्षा यावेळी बाजारात ग्राहक अधिक प्रमाणात खरेदीसाठी येत आहेत.तसेच सर्वच प्रकारचा माल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असल्याचे त्यांनी सांगितले.