नवीन वर्षाचे स्वागत

जुने जाऊद्या मरणालागून, जाळून किंवा पुरुन टाका असे केशवसुत म्हणाले. दिनदर्शिकेतील एक पान बदलून जुने वर्ष इतक्या झटपट पुरून टाकता येते की नाही हे सांगणे कठीण आहे. पण नव्याचे कौतुक करण्याचा भाव मात्र सच्चा आहे. त्याच भावनेने 2024 चे स्वागत करायला हवे. आमचे असंख्य वाचक आणि कृषीवल परिवारातील सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणतेच एक वर्ष किंवा काळ पूर्ण वाईट किंवा पूर्ण चांगला नसतो. तरीही गेलेल्या वर्षापेक्षा नवीन वर्ष अनेक बाबतीत वेगळे ठरो अशी अनेकांची इच्छा असेल यात शंका नाही. आपले बरेचसे समाजजीवन आणि सार्वजनिक चर्चा राजकारण या विषयाभोवती फिरत असते. त्यामुळे राजकीय मंडळी, त्यातही अधिक करून सत्ताधारी मंडळी ही सिनेतारका किंवा क्रिकेटपटूंपेक्षाही अधिक भाव खाऊन असतात. त्यांनी कितीही उलटसुलट गोष्टी केल्या, भूमिका बदलल्या आणि आश्वासनांवर पाणी ओतले तरीही बातम्यांच्या केंद्रस्थानी हेच लोक राहतात. 2022 मध्ये शिवसेनेत तर 2023 मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. राजकीय समीकरणे कल्पनेच्याही पलिकडे बदलली. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये तत्व, निष्ठा, विचारसरणी यांना बाद झालेल्या नोटांइतकीच किंमत उरली. 2024 हे तर निवडणुकांचे वर्ष आहे. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नव्या वर्षात तत्व आणि विचारांच्या आणखी नोटा बाद होऊ नयेत अशी आशा कोणीही सामान्य माणूस करील. नरेंद्र मोदींचा भाजप लोकसभेमध्ये विक्रमी विजय मिळवण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेला दिसतो. ती साध्य करण्याच्या प्रयत्नात राजकारण अधिकाधिक घसरत जाऊ नये. शिवाय नंतर महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवण्याच्या इच्छेपायी समीकरणांची वाटेल ती मोडतोड होऊ नये. अर्थात यासाठी विरोधकांना आपले अहंकार बाजूला ठेवून आणि एक ठाम इच्छाशक्ती दाखवून लढाईत उतरावे लागेल. तरच जनतेकडून साथ मिळण्याची अपेक्षा ते ठेवू शकतील.

पर्यावरणाच्या हाका

गेल्या काही वर्षांमध्ये धर्म आणि राजकारणाने आपल्या जीवनावर कमालीचा ताबा मिळवला आहे. विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती इत्यादींची चर्चा करण्याचा अवसर आणि अवकाश नाहीसा होत चालला आहे. गेल्या वर्षी भारताने चंद्रावर आणि सूर्यावर स्वारी केली. जगात आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा बोलबाला वाढतो आहे. जमीन नसताना किंवा पाण्याचा कमीत कमी वापर करून शेती करण्याचे प्रयोग जगभर चालू आहेत. नृत्य, नाटक, संगीत यामध्ये जगभरात विविध प्रयोग होत आहेत. दुर्दैवाने आपल्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, सोशल मिडिया यांमध्ये याबाबत फारशी चर्चा नसते. बहुसंख्य लोकांना राजकारणाच्या चर्चेमध्ये बुडवून ठेवले जाते. त्यातून काहीच अर्थपूर्ण साध्य होत नाही. ना लोकांची राजकीय समज वाढते, ना ते त्याविषयी अधिक सजगपणे विचार करू लागतात. नवीन वर्षात हे सर्व बदलो किंवा निदान या बदलाची सुरूवात होवो. पर्यावरण जपणे हा सर्व जगापुढचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले वर्ष आजवरच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक होते. भारतातही म्हणावा तसा पाऊस झाला नाही व आतादेखील पुरेशी थंडी पडलेली नाही. दक्षिण व उत्तर ध्रुवांजवळचे हिमखंड शेकडो वर्षात पहिल्यांदाच वेगाने वितळत चालले आहेत. युरोप व अमेरिकेत कडाक्याचा उन्हाळा व नंतर पुरांचा अनुभव तेथील लोकांनी घेतला आहे. आपल्याकडेही तमिळनाडूमध्ये नुकताच डिसेंबरमधील अभूतपूर्व पाऊस झाला. तुथुकोडीसारख्य जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये चार दिवस पुरुषभर उंचीचे पाणी भरले होते. खुद्द्‌‍‍ चेन्नईतही अनेक भागात पूर आले. हा सर्वच प्रकार अतर्क्य आहे. गेल्या वर्षी एल निनोचा फटका आपल्याला बसला. महाराष्ट्राच्या अनेक भागात भयंकर पाणीटंचाई व दुष्काळाची परिस्थिती जाणवणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या काळातच लोकांचे जिणे कठीण होणार आहे. राजकारणापेक्षाही आता या खऱ्या प्रश्नांची अधिक चर्चा करण्याचा संकल्प करण्याची वेळ आली आहे. 2024 चे आगमन हा मुहूर्त आपण त्यासाठी साधायला हवा.

महाराष्ट्राचे काय होणार

महाराष्ट्रात शंभर वर्षांपूर्वी ब्राह्मणेतर चळवळीने जोर पकडला. फुले व शाहू महाराजांचा वारसा सांगणारे अनेक धुरीण व विचारवंत पुढे आले. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे व काळाराम मंदिरात सत्याग्रह केले. अशी थोर परंपरा ज्या राज्याला लाभली आहे तेथे सामाजिक क्षेत्रातील वातावरण निकोप व पुढारलेले असणारच असा कोणाचाही समज होईल. पण अलिकडे मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने घडलेल्या घटना हा समज खोटा ठरवणारा आहेत. मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांची मागणी रास्त असली तरी त्यांचा लढा केवळ मराठा समाजापुरता आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भाषणात दर वाक्यामध्ये आम्हा मराठ्यांना, आम्ही मराठे असे शब्दप्रयोग येतात. एकविसाव्या शतकातल्या महाराष्ट्रात घडणारा हा प्रकार विस्मयकारक आहे. त्याहूनही अधिक धक्कादायक होता तो जरांगे आणि भुजबळ यांच्यातला कलगीतुरा. त्यांच्या भांडणामुळे मराठा विरुध्द ओबीसी असा संघर्ष पेटेल की काय अशी भीती निर्माण झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कलगीतुरा थांबवण्यासाठी कोणाही राजकीय वा सामाजिक नेत्यांनी प्रयत्न  देखील केले नाहीत. महाराष्ट्राला पुरोगामी का म्हणावे असा सवाल या कलगीतुऱ्यामुळे निर्माण झाला. अर्थात, याच रीतीने सामाजिक माध्यमांवरच्या चर्चेत ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी अशी एक फूट पडलेली आहे. त्यात सोईस्कर असे वर्गीकरण केले जात असते. 2024 मध्ये तरी महाराष्ट्र आपल्या मूळ आणि अस्सल पुरोगामी परंपरेकडे परत जाईल आणि जनतेच्या खऱ्या प्रश्नांबाबत बोलू लागेल अशी आशा करूया. सरतेशेवटी, मराठी भाषेचा झपाट्याने होणारा ऱ्हास ही चिंतेची बाब आहे. मराठी शाळांचे प्रमाण आणि तेथील मराठी शिकणाऱ्यांची संख्या वेगाने खालावत आहे. मुंबई-पुण्यातच नव्हे तर रायगडच्या ग्रामीण इलाख्यातही इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ वाढते आहे. मराठी भाषा आणि संस्कृती आपल्याला वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने हाका मारत आहे. जिच्या दुधावर पोसलो ती आपली मायभाषा वाचवण्यासाठी मराठी म्हणवणारे सर्व लोक यंदा तरी जागे होवोत अशी अपेक्षा.

Exit mobile version