गणरायाचे स्वागत खड्डे, कोंडी अन्‌‍‍ अंधारात!

| उरण | प्रतिनिधी |

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाच्या आगमनाची तयारी उरणमध्ये जोरात सुरू असतानाच शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि विजेच्या लपंडावाने प्रशासनाच्या नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट आहे. बाप्पाला घरी आणायचे तरी खड्ड्यांच्या मार्गाने कसे? असा सवाल आता उरणकर विचारत आहेत.

गणेशोत्सव हा उरणकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा मोठा सण. घराघरांत गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप, सजावट, रोषणाई आणि मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर उत्सवाच्या तयारीपेक्षा प्रशासनाच्या निष्क्रियतेचीच चर्चा अधिक रंगताना दिसत आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हे खड्डे आणखी धोकादायक बनले असून वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. गणेशमूर्ती घेऊन येणारी वाहने, सजावटीचे साहित्य घेऊन जाणारी वाहने तसेच गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या आगामी दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची डागडुजी न झाल्यास अपघाताला आमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव जवळ आला की रस्ते दुरुस्तीच्या हालचाली सुरू होतात. काही ठिकाणी वरवरची डागडुजी करून प्रशासन काम झाले असे दाखवते; मात्र पावसाची एक-दोन सर आली की डागडुजीची पोलखोल होते. यंदाही अशीच डागडुजी करून वेळ मारून नेण्याचा प्रकार झाला तर गणेशभक्तांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.दरम्यान, शहरातील अरुंद रस्ते आणि वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या आधीपासूनच गंभीर आहे. त्यात रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने, बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे प्रमुख मार्गांवर नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नियोजन फक्त बैठकीपुरतेच?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दरवर्षी विविध बैठका घेतल्या जातात. रस्ते, वाहतूक, वीज, स्वच्छता, पाणी, सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्था याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर 'नियोजन झाले तरी कुठे? असा प्रश्न उरणकरांना पडला आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत लाखो भाविक रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, अपुरे पथदिवे आणि वीजपुरवठ्याची समस्या वेळीच दूर करणे आवश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने धावपळ करण्यापेक्षा उत्सव सुरू होण्यापूर्वीच त्रुटी दूर करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
Exit mobile version