ट्रॉमा केअर सेंटर उभारणीचे पुढचे पाऊल कधी?

अपघातग्रस्तांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मिळणार उपचार
। माणगाव । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस ‘अपडेट’ होत असून, महामार्गावरील अपघातग्रस्तांवर उपचार करण्यापासून ते विविध आजारांवरील रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यातच नजीकच्या काळात ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत आणखी एक भर पडणार असून, माणगावची आरोग्य यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरमुळे अधिक बळकट होणार आहे. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचणार आहेत. मात्र, हे ट्रॉमा केअर सेंटर उभारणीसाठी पुढचे पाऊल कधी, असा हा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे.

माणगाव येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हे विविध रुग्णांच्या आजारावर व शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक विभाग सज्ज आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सिटीस्कॅन मशीनची गरज आहे. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटरचीही फार मोठी गरज भासत होती. महामार्गावरील हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोली तसेच विविध तालुक्यांतून रुग्ण उपचारासाठी येथे येतात. शिवाय, दक्षिण रायगडमधील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, पाली येथूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. ट्रॉमा केअर सेंटर व सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित झाल्यास माणगावात रुग्णावर निदान व उपचार होऊन त्या रुग्णांचे प्राण वाचून जीवदान मिळेल, अशी अशा नागरिकांना वाटत आहे. माणगाव उपजिल्हा रूग्णालयालगत हे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार असून, तेथे 25 ते 30 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे शासनाने जाहीर केले होते. या ठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ व त्याला लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग, एक्स-रे सुविधा, हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी सुविधा असणार आहे. याच रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारल्यामुळे रुग्णांना याचाही लाभ होत आहे.

वातावरणीय बदलांमुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती, रस्ते अपघाताप्रसंगी रुग्णांच्या बचावासाठी अतिमहत्त्वाच्या कालावधीत अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळण्यासाठी ट्रॉमा केअर युनिट जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत असणे गरजेचे आहे. त्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उपलब्ध होण्यासाठीची विनंती जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून सुमारे 110 कि.मी. अंतरावर असलेल्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयाची 100 इतकी बेड क्षमता आहे. नियोजित ट्रॉमा केअर युनिटमुळे गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांवर तातडीची वैद्यकीय मदत व सुविधा मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकते.

Exit mobile version