रस्ते धुळमुक्त कधी होणार?

संतप्त नागरिकांचा सवाल

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान येथील रस्ते हे लाल मातीचे तर काही रस्ते मातीपासून बनवलेल्या क्ले पेव्हर ब्लॉक यांच्यापासून बनविलेले आहेत. परंतु, मातीचे रस्ते ज्या भागात आहेत त्या भागातून प्रवास करणार्‍या विद्यार्थींना आणि वयोवृद्ध पर्यटकांना धुळीचा मोठा त्रास होत आहे. तसेच, रस्त्यावरून उडणारी धूळ आजुबाजुंच्या झाडांवर जाऊन बसली असून झाडांच्या पानांचे रंगदेखील बदलले आहेत. त्यामुळे माथेरान नगरपरिषद ते रस्ते धूळमुक्त कधी करणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

माथेरान शहर लाल मातीच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहरातील प्रमुख रस्ते सर्वोच्य न्यायालयाच्या परवानगीने मातीपासून बनवलेल्या क्ले पेव्हरपासून बनवले गेले आहेत. शहरातील दस्तुरी ते नगरपरिषद वाचनालय तसेच हॉटेल लाईनकडील आणि काही प्रेक्षणीय स्थळांचे रस्ते वगळता माथेरानमधील 80 टक्के रस्ते आजही लाल मातीचे आहेत. त्यातील 13 रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याची कामे करण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. मात्र, माथेरान पालिका प्रशासन उदासीन असल्याने त्यातील अनेक रस्ते लाल मातीचेच राहिले आहेत.

2022 मध्ये आठ आठवड्यांसाठी शहरातील 11 रस्त्यांची कामे सर्वोच्य न्यायालयाने थांबविली होती. मात्र, त्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी माथेरान नगरपरिषद त्या रस्त्यांची गरज आणि उपयुक्तता याबाबत सर्वोच्य न्यायालयात आपले म्हणणे मांडू शकली नाही. त्याचा परिणाम शहरातील जे काही प्रमुख रस्ते क्ले पेव्हर लावण्यापासून वंचित आहेत त्यातील माथेरान नगरपरिषद वाचनालय ते छत्रपती शिवाजी महाराज रोड आणि ऑलंपिया रेसकोर्सकडे जाणार्‍या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात माती असून ती माती माणसांच्या चालण्यानेदेखील उडत असते.

Exit mobile version