मुरुडकरांचा प्रशासनास सवाल
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा नगरपरिषद हद्दीतील वाढती लोकसंख्या तेवढीच दुचाकी वाहनांची संख्या झपाट्याने होणारी वाढ प्रशासनाला डोकेदुखी वाढू लागली आहे. शहरातील भाजी मार्केट किंवा मच्छी मार्केट या ठिकाणी कोणतेही वाहनतळ नसल्याने रोजच्या रोज वाहतूक कोंडीला वाहनचालकांसह पादचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सामान्य नागरिकांकडून नाराजी दर्शवली असून, वाहतूक कोंडीपासून मुरुडकर कधी मुक्त होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
मुरूड पर्यटन स्थळे असल्याने पर्यटक आपल्या वाहनातून ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शहरातील मच्छीमार्केटजवळील मुख्य रस्त्यावरून ये-जा करत असतात. परंतु, या ठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीला पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरुन जाणार्या-येणार्या वाहन चालकांना गाडी चालवताना याठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे. याठिकाणी हा मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणी गाड्यांची वर्दळ जास्त असते. तरीही कोळी महिला मच्छी विक्रीते मच्छी मार्केटमध्ये न बसता बाहेर विक्री करीत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.
यासंदर्भात सागर कन्या मच्छिमार सोसायटीचे व्हाइस चेअरमन मनोहर मकु यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, दुचाकी वाहनचालक बिनधास्तपणे कुठेही गाडी उभी करतात, त्यामुळे शहरातील जिकडे तिकडे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर शहरातील भाजी मार्केट व मच्छी मार्केट या ठिकाणी एक दिशा मार्ग अवलंबला पाहिजे, तरच वाहतूक कोंडी आळा बसेल नाहीतर वाहतूक कोंडी कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येकाच्या घरी दुचाकी व चारचाकी वाहन बघायला मिळते, अशी प्रतिक्रिया मनोहर मकू यांनी दिली.