प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांचा सवाल
| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण नुकतेच दिमाखात पार पडले. मात्र, या सोहळ्यानंतर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांमध्ये दि.बा. पाटील यांच्या नावाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विमानतळासाठी हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली असून अनेक शेतकरी आणि कुटुंबांनी विकासासाठी त्याग केला आहे. या पार्श्वभूमीवर जनआंदोलनानंतर शासनाने विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असतानाही अधिकृत फलक, कागदपत्रे आणि व्यवहारांमध्ये या नावाचा ठळक वापर दिसत नसल्याची भावना प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे की, हा विषय केवळ नामकरणाचा नसून भूमिपुत्रांच्या त्याग, संघर्ष आणि अस्मितेशी जोडलेला आहे. त्यामुळे शासनाने नामकरणाचा निर्णय कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात सर्व स्तरांवर दिसेल, यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
