विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मूकबधीर विद्यार्थ्यांना अद्ययावत असे विद्यालय उभारण्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत या इमारतीचे फक्त 30 टक्केच काम झाले आहे. ठेकेदाराच्या संथ कामामुळे हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भाड्याच्या इमारतीमधून शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान, नव्या मूकबधीर विद्यालयाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.
समाजकल्याण विभागाने 1986 मध्ये अलिबागजवळील विद्यानगर या ठिकाणी शासकीय मूकबधीर विद्यालय बांधण्यात आले होते. जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे भाडेतत्त्वावरील इमारतीमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करण्यात आले. जीर्ण झालेल्या मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी 15 ऑगस्ट 2021 मध्ये भूमीपूजन सोहळा थाटामाटात करण्यात आला होता. या इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन कोटी 46 लाख 92 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. ठेकेदाराला 50 लाखांहून अधिक निधी वर्ग करण्यात आला. भूमीपूजन होऊन तीन वर्ष, तीन महिने होत आले आहेत. मात्र, अजूनपर्यंत या इमारतीचे काम संथ गतीनेच सुरू आहे. विद्यार्थ्यांना हक्काच्या शाळेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नव्या शाळेत कधी शिकायला मिळेल, अशी आशा विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.
परंतु, ठेकेदारांनी घोर निराशा केल्याची चर्चा जोर धरत आहे. आतापर्यंत फक्त तीस टक्केच काम पूर्ण झाले आहे. अलिबाग तालुक्यातील विद्यानगर भागातील 31 गुंठे परिसरात मूकबधीर विद्यालय बांधले जाणार आहे. या ठिकाणी उद्यान, क्रीडांगण असून, एक मजली इमारत बांधण्यात येणार आहे. यामध्ये आठ वर्ग खोल्या, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान, विद्यालयातील अधीक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान, श्रवण चाचणी खोली, वैद्यकीय कक्ष, अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज असे सभागृह असणार आहे. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे. या इमारतीचे काम पूर्ण होत नसल्याने दर महिन्याला 20 हजारांहून अधिक रुपये भाड्याच्या शाळेसाठी खर्च करावे लागत आहेत.
मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीच्या कामाला गेल्या काही महिन्यांपासून गती आली आहे. दुसरा स्लॅब पडला आहे. गेली काही दिवस वरसोलीची यात्रा सुरु होती. त्यामुळे काम बंद होते. आता पुन्हा नव्याने काम सूचना केली आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राहुल देवांग, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद, बांधकाम विभाग