| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीमधील बाजारपेठ भागातील मुख्य रस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध काही विजेचे खांब कायम राहिले आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षांत ते खांब बाजूला करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. दरम्यान, ते विजेचे खांब हटविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
नेरळ ग्रामपंचायत जकात नाका ते नेरळ स्टेशन, हुतात्मा हिराजी पाटील चौक ते पाडा रेल्वे गेट, लोकमान्य टिळक चौक ते कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्ता, लोकमान्य टिळक चौक ते मिनीट्रेन गेट, नेरळ स्टेशन ते खांडा, जुनी बाजारपेठ साने वाडा ते जैन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कुंभार आळी मार्गे राजमाता जिजामाता तलाव या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यावेळी नेरळ बाजारपेठ रस्त्यावर काही विजेचे खांब हे पूर्वीच्या जुन्या अरुंद रस्त्याच्या मध्ये होते. नव्याने रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाला वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या कडेला काही विजेचे खांब उभे आहेत. ते खांब रस्त्यातून काढून रस्त्याच्या बाहेर पुन्हा उभे करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून महावितरण कंपनीला निधी दिला नव्हता. मात्र, नेरळ गावातील विजेचे खांब रस्त्यातून हटविण्यासाठी आता नेरळ प्राधिकरणकडून निधी दिला जाणार आहे. मात्र, तोपर्यंत विजेचे खांब आजही नेरळ गावातील रस्त्यांवर कायम आहेत. विजेचे खांब धोकादायक अवस्थेत उभे असल्याने ते तातडीने काढण्यात यावेत, अशी मागणी नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी केली आहे.
समीर पाटील, शाखा अभियंता, राजिप
एमएमआरडीएकडून नेरळ गावातील रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यावेळी विजेचे खांब काढण्यासाठी निधी देण्यात आला नव्हता आणि त्यामुळे ते आजही तेथे आहेत. महावितरणकडून निधीची मागणी करण्यात आली असून, आम्ही तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर तो निधी महावितरणकडे हस्तांतरित करणार आहोत.