| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील आदिवासी वाड्या आजही विविध समस्येच्या गर्तेत आहेत. पाणी, रस्ते, आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. पावसाळ्यात त्यांना स्थलांतरीत केले जाते यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले होते. त्याबाबत काय झाले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
तालुक्यातील पाली,परळी,पेडली अशा प्रमुख बाजारपेठा सोडल्या, तर संपूर्ण तालुका हा दुर्गम भागात मोडतो. पाली हे तालुक्याचे मुख्यालय असून सर्व शासकीय कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज, पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय पाली याठिकाणी असल्याने नागरिकांना पाली येथे कामानिमित्त यावे लागते. तालुक्यातील दुर्गम भागातून येणारे आदिवासी नागरिक एसटीच्या सहाय्याने येतात. काही वाड्यांपर्यंत रस्ता नसल्याने दहा पंधरा मैलाच्या अंतरावरून पायपीट करून यावे लागते. दळणवळणाबरोबरच अनेक समस्यांनी आदिवासी बांधव ग्रासले गेले आहेत. रस्ते,पाणी, शाळा, आरोग्य सेवा याबरोबर दैनंदिन राहणीमान याकडे देखील शासनाचे दुर्लक्ष होताना दिसते.
सुधागडमधील माणगावं खुर्द,तळई, भाळगुल,जांभूळपाडा अशी अनेक गावे ही दरडग्रस्त आहेत. पावसाळा आला, की शासनाकडून स्थलांतराच्या नोटीसा येतात, परंतु यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. स्थलांतर करायचे झाले, तर गाव सोडून जाणार कुठे हा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावतो. पावसाळा गेला की परिस्थिती जैसे थे असते. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सुधागड तहसील कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. या बाबतचे पत्र माणगाव बुद्रुक ग्रामपंचायतला देखील दिले होते. याबाबत या पत्राच्या अनुषंगाने काय व कोणती कारवाई झाली. याची विस्तृत माहिती मिळावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवेलेल्या या पत्राबाबत अद्यापही कारवाई झाली नसल्यास दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.