तीन गंभीर जखमी
| पनवेल| प्रतिनिधी |
सानपाडा येथून पेण-खरोशी येथील केळंबा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांची कार 20 फूट खोल नाल्यामध्ये पडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, कारचालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाच जण केळंबा देवीच्या दर्शनासाठी ब्रिझा कारने जात होते. त्यांची कार शिरढोण येथील साईकृपा ढाब्याजवळ आली असता भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालक विलास पाटील याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीस फूट नाल्यात जाऊन कोसळली.
या अपघातात रमेश शिमग्या पाटील (40) आणि जीवन काशिनाथ पाटील (52) यांचा मृत्यू झाला असून चालक विलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि मनीष पाटील यांचा जखमींमध्ये समावेश आहे. हे सर्वजण सानपाडा गावातील रहिवासी आहेत. त्यामुळे सानापाडा गावावर शोककळा पसरली आहे. जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.