डोंगरी टेकडीवरील सन सेट पॉईंट होणार कधी?

9 वर्षांपासून अडकला वनखात्याच्या कचाट्यात

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

मुरुडचे निसर्गसौंदर्य नेहमीच पर्यटकांना खुणावत असते. जंजिरा किल्ल्याकडे जाताना डोंगरी टेकडीच्या भागावर सनसेट पॉईंट विकसित करण्यात येणार होता. मात्र, गेल्या नऊ वर्षापासून वन विभागाच्या जाचक अटींमध्ये त्याचा विकास रखडला आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला जंजिरा किल्ला हा देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. वर्षभरात सुमारे पाच ते सहा लाख पर्यटक जंजिरा किल्ल्याला भेट देत असतात. हा किल्ला हा राजपुरी गावात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगरी गावाला वळसा घालून जावे लागते. उंच अशा डोंगरातून हा मार्ग जातो. उजवीकडे अथांग समुद्र असल्याने येथे सूर्यास्तचे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी तसेच उंच डोंगरावरून निळाक्षार समुद्र व खोरा बंदर पहाण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना बसण्यासाठी बेंच व उंच असा चौथरा निर्माण करून एक आकर्षक पॉईंट म्हणून विकसित करण्यात येणार होते. मात्र गेली नऊ वर्ष हा प्रकल्प वनखात्याच्या परवानगीसाठी अडकला आहे. नऊ वर्षांपूर्वी माजी आमदार मीनाक्षी पाटील यांनी प्रस्ताव तयार करून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. जाचक अटी दूर करुन यासाठी विशेष निधीची तरतूद केल्यास लवकरच प्रकल्प मार्गी लागू शकतो. डोंगरी-राजपुरी रस्त्यावर सनसेट पॉइंट सुशोभिकरण केल्यास एकदरा, डोंगरी, माझेरी व राजपुरी येथील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.

सदरच्या पॉईंटच्या विकासासाठी रस्ता 7 मीटर, रस्त्यापासून एक फूट उंचीची संरक्षक भिंत, सेफ्टी गटर, रेलींग, 4 स्वच्छतागृहे, 15 ते 20 गाड्यांसाठी वाहनतळ, हाय मास्ट दिवे, गार्डन आदी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या होत्या.
Exit mobile version