भाजी विक्रेत्यांचा संतप्त सवाल; अमानत रक्कम भरूनही फरफट
| पेण | प्रतिनिधी |
पेण नगरपालिकेने आरक्षण क्रमांक 14 मधील अंतिम भूखंड क्रमांक 100 व 101 या जागेवर बीओटी तत्त्वावर भाजी मार्केटची उभारणी केली. मात्र, भाजी विक्रेत्यांसाठी उभारण्यात आलेल्या या मार्केटमधील गाळे जवळपास पाच वर्षे उलटूनही संबंधित विक्रेत्यांच्या ताब्यात देण्यात आले नसल्याने “भाजी मंडई सुरू कधी होणार?” असा संतप्त सवाल भाजी विक्रेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये भाजी मार्केटच्या मागील बाजूस असलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय त्रिसदस्यीय समितीने घेतला होता. या प्रक्रियेनुसार तळमजल्यावरील 24 आणि पहिल्या मजल्यावरील 35 असे एकूण 59 दुकानांचे गाळे, तसेच तळमजल्यावरील 38 ओटे तीन वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर इच्छुक भाजी विक्रेत्यांकडून पाकीटबंद निविदा मागविण्यात आल्या. निविदा उघडल्यानंतर चढत्या दराने बोली लावणाऱ्या पात्र निविदाधारकांना गाळे देण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये किमान सुमारे 42 हजार रुपये ते कमाल 48 हजार रुपयांपर्यंतची रक्कम, तसेच अमानत रक्कम घेण्यात आल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, कराराची मुदत आणि आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप गाळेधारकांना प्रत्यक्ष गाळ्यांचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. काही भाजी विक्रेत्यांनी गाळ्याची अमानत रक्कम भरण्यासाठी कर्ज काढल्याचेही सांगितले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून कर्जाचे व्याज भरावे लागत आहे; मात्र, ज्या गाळ्यासाठी पैसे भरले तो गाळाच अद्याप ताब्यात मिळालेला नाही, अशी व्यथा विक्रेत्यांनी व्यक्त केली.
