डोक्यावरचा हंडा उतरणार कधी?

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पाणीटंचाईच्या झळा बसू नये, याकरीता प्रशासनाने अनेक उपाय केले. मात्र तरीही रायगड जिल्ह्यातील 56 गावे व 244 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने, हंडाभर पाण्यासाठी दोन मैल जीवघेणी डोंगरकपारीतील खडतर पायपीट महिलांना करावी लागत आहे. गेली कित्येक वर्षे प्रशासनाला हा प्रश्‍न सोडविण्यात यश आलेले नाही. परिणामी, आमच्या डोक्यावरचा हंडा अजून किती वर्षांनी उतरेल, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.

पाणी म्हणजेच जीवन आहे याचा जीवघेणा प्रत्यय टंचाईग्रस्त आदीवासीवाडीवर गेल्याशिवाय कळत नाही. हंडाभर पाण्यासाठी दररोज मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्यच त्यांच्या नशिबी आले आहे. ग्रामीण भागातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालताना फार त्रास होतो. हंडाभर पाण्याचे मोल किती आहे, हे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते.

प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरु झाला की, पाणीप्रश्‍न तोंड वर काढतो. त्यात महिला आणि लहान बालके यांच्या डोक्यावर हंडे-घागरी, सायकलीला अडकवलेली केंड-घागरी, हातगाड्यावर पाण्याच्या टाक्या, घागरी व इतर माध्यमातून पाणी मिळवण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येते. हे चित्र प्रत्येक उन्हाळ्यात कमी-अधिक फरकाने दिसते. अलीकडे काही पुरुषमंडळी घरातील महिलांबरोबर पाणी भरण्याच्या मदतीसाठी येत असल्याचे दिसतात. या वर्षी देखील अनेक ठिकाणी टंचाईग्रस्त गावांना 45 शासकिय टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रशासनाने अनेक उपाय करुनही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईचा फटका जास्त गाव-वाड्यांना बसला असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून समोर आली आहे. गतवर्षी याच दिवशी 48 गावे व 158 वाड्यांना 29 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली असून आता 8 गावांची वाढ झाली आहे; तर 86 वाड्यांची अधिक भर पडली आहे.

2024 2023
56 गावे48 गावे
244 वाड्या158 वाड्या
45 टँकर29 टँकर
Exit mobile version